शिलांग - देशभरात चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मेघालय पोलिसांसमोर राजाची पत्नी सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राज कुशवाहा आणि सोनम कपूरला आमनेसामने आणले. ठोस पुराव्यासोबतच सोनम आणि राज समोरासमोर आल्याने त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीच राहिले नाही त्यामुळे अखेर सोनमने रडत रडत तिचा गुन्हा कबुल केला आहे.
मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनीमून अंतर्गत २३ मे रोजी शिलांगच्या सोहरात झालेल्या राजा रघुवंशी हत्येच्या तपासात मोठा खुलासा केला. पोलिसांनी सोनम आणि राज कुशवाह दोघांना समोरासमोर आणून चौकशी केली. ४२ सीसीटीव्ही फुटेज, रक्ताने माखलेले जॅकेट, सोनमचे रेनकोट आणि अन्य पुरावे समोर ठेवले. पुराव्याच्या दबावामुळे सोनमनं अखेर तोंड उघडले आणि तिने गुन्ह्याची कबुली दिली. राज कुशवाह आणि ३ सुपारी किलर्स आकाश राजपूत, विशाल ठाकूर, आनंद कुर्मी यांच्यासोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचल्याचे तिने तपासात सांगितले.
हनीमूनच्या बहाण्याने सोनमने राजाला सोहराच्या निर्जनस्थळी नेले आणि इतर आरोपींना तिथले लोकेशन पाठवले. त्यानंतर सासूला अपरा एकादशीचा उपवास केल्याचे सोनमने खोटे सांगितले ते हॉटेलच्या रेकॉर्डमधून तिने जेवण केल्याचे समोर आले. हत्येनंतर सोनमने राजाच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून सात जन्मो का साथ ही पोस्ट पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी केली. पोलिसांना गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळ हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले.
दरम्यान, मेघालय पोलिसांनी सोनम, राज कुशवाह आणि इतर तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सोनमने ९ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाजीपूर इथं सरेंडर केले. राजाचा काटा काढून राज कुशवाहसोबत नव्याने आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सोनमने हे पाऊल उचलले हे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी राजाचा भाऊ सचिन आणि वडील अशोक रघुवंशी यांनी सोनमला फाशीची शिक्षा देत तिच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. तर सोनमचा भाऊ गोविंद यानेही हत्येतील आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करत आम्हाला या षडयंत्राबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे.