मुंबई : विवाह संकेतस्थळावरून महिलांशी ओळख करून लग्नाची मागणी घालायची. महिला जाळ्यात येताच कुठेतरी मंदिरात लग्न उरकून वेगवेगळी करणे पुढे करत पैसे उकळणाऱ्या तरुणाविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रेल्वेत नोकरी करणाऱ्या तरुणीची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे समोर येताच तिने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी धीरेंद्रकुमार गौतम (३५) नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. त्याचे तीन विवाह झाल्याचे समोर आल्यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेतली. मूळची मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेली ३० वर्षीय पीडित घटस्फोटीत महिला रेल्वेमध्ये टेक्निशियन आहे. २०२३ मध्ये विवाह संकेतस्थळावर धीरेंद्रकुमारने तिला रिक्वेस्ट पाठविली. दोघांची भेट झाली. त्याने लग्नाची मागणी घालताच तिनेही होकार दिला. त्याने तो केंद्रीय दिल्ली विद्यालयात शिक्षक असल्याचे सांगितले. हरिद्वार येथील छोट्या मंदिरात तिच्याशी लग्न केले. महिला मुंबईत परतल्यानंतर, आरोपीने वेगवेगळी कारणे देत तिच्याकडून १४ लाख रुपये घेतले. तसेच महिलेच्या वडिलांकडून चार लाख, भावाकडून अडीच लाख, असे एकूण २० लाख ५० हजार रुपये घेतले. याच दरम्यान, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी या दाम्पत्याला मुलगा झाला. तरी सुद्धा धीरेंद्रकुमार तिच्याकडे पैशाची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास शिवीगाळ करून मारहाण करीत होता. अखेर अत्याचाराला कंटाळून ती माहेरी परतली.
चौकशीत तो जेलमध्ये असल्याचे झाले उघडधीरेंद्रकुमार यांनी तिच्याशी बोलणे कमी केले. पीडित महिलेने सासऱ्यांना फोन केला असता, धीरेंद्रकुमार याच्यावर पोलिस केस झाली असून, तो जेलमध्ये असल्याचे समजले. यावर्षी मार्च महिन्यात धीरेंद्रकुमार याची आणखी दोन लग्न झाले असून, त्यास ६ वर्षांचा मुलगा असल्याचे शेजाऱ्यांकडून समजताच तिला धक्का बसला. धीरेंद्रकुमारने तिला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कुठे किती गुन्हे? धीरेंद्रकुमारने २०१६ मध्ये पहिला विवाह केला होता. त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी कौटुंबिक छळाच्या केलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, हा विवाह लपवून त्याने पीडित महिलेशी विवाह केला. पुढे आणखी एकीला सरकारी नोकरी असल्याचे सांगून १७ एप्रिल २०२३ रोजी कोर्ट मॅरेज केले. धीरेंद्रकुमार याने तिच्याकडून ४५ लाख रुपये घेत तिची फसवणूक केल्याची तक्रार २०२४ मध्ये कोतवाली पोलिस ठाण्यात केली. याप्रकरणी गुन्हा नोंद असल्याची पीडित महिलेने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे.