उत्तर प्रदेशात एका किरकोळ घरगुती वादातून संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीच्या चेहऱ्यावर उकळती चहा फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पतीचा चेहरा, हात आणि छाती गंभीररित्या भाजली आहे. एवढंच नाही, तर पत्नी घरातील सामान आणि कपाटात ठेवलेले १.४४ लाख रुपये घेऊन पळून गेली. ही घटना गाझियाबादच्या वेव सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
नेमकं काय घडलं?
या प्रकरणी पीडित पतीने वेव सिटी पोलीस ठाण्यात पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. सौरभ सिंह असे पीडित पतीचे नाव असून ते वेव सिटीमधील ओकवुड एन्क्लेव अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची पत्नी अंकिता सिंह आहे. सौरभने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सांगितले की, पत्नीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
सौरभच्या म्हणण्यानुसार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्यात कौटुंबिक बाबींवरून वाद झाला. त्यावेळी गॅसवर चहा उकळत होता. याच वादाच्या भरात अंकिताने उकळती चहा घेऊन ती सौरभच्या चेहऱ्यावर फेकली. या हल्ल्यामुळे सौरभचा चेहरा, डावा हात आणि छाती भाजून मोठे फोड आले. या हल्ल्यात त्याच्या डोक्यालाही सूज आली आणि नाकातून रक्त येऊ लागले.
१.४४ लाख रुपये घेऊन पत्नी पसार
या हल्ल्यानंतर अंकिताने घरातील काही सामान आणि कपाटात ठेवलेले १.४४ लाख रुपये घेतले आणि ती निघून गेली, असा आरोप सौरभने केला आहे. त्याने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, त्याच्या पत्नीने याआधीही त्याच्यावर हल्ला केला आहे आणि अनेकदा खोट्या आरोपांमध्ये त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलिसांनी सौरभच्या तक्रारीवरून अंकिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर स्वरूप दर्शवते.