पत्नीने माहेरून परत येण्यास नकार दिला, या रागाच्या भरात एका माथेफिरू पतीने थेट आपल्या सासरच्या घरालाच आग लावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सासरच्या मंडळींनी मागील दाराने पळ काढल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, निजामपेट गावातील रहिवासी पिटलम बलैया यांची मुलगी सायव्वा हिचा विवाह १५ वर्षांपूर्वी रवी नावाच्या तरुणाशी झाला होता. या दांपत्याला तीन मुलेही आहेत. मात्र, रवीला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन पत्नीला अमानुष मारहाण आणि छळ करत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळून सायव्वा गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलांसह माहेरी राहत होती.
मध्यस्थीही ठरली निष्फळ
दोघांमधील वाद मिटवण्यासाठी अनेकदा गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत पंचायतीही भरवण्यात आल्या. मात्र, रवीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे सायव्वा पुन्हा पतीच्या घरी जाण्यास तयार नव्हती. याचाच राग रवीच्या मनात होता.
पेट्रोल ओतलं अन् घर पेटवून दिलं!
गुरुवारी रात्री रवी आपल्या सासरच्या घरी पोहोचला. तिथे त्याने पत्नीला आपल्यासोबत पाठवण्यासाठी सासरच्या मंडळींशी जोरदार वाद घातला. सासरच्यांनी मुलीला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला. हा नकार ऐकताच रवीचा पारा चढला. त्याने आपल्यासोबत बाटलीत आणलेले पेट्रोल संपूर्ण घरात शिंपडले आणि आग लावून दिली.
क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. घराच्या आवारात उभी असलेली सायकल आणि इतर साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत मागच्या दाराने बाहेर धाव घेतली, ज्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. या गोंधळाचा फायदा घेत आरोपी रवी घटनास्थळावरून पसार झाला.
पोलीस तपासात वेग
सासरच्या मंडळींनी याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू केला आहे. "दारूच्या नशेत आणि रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले आहे, आम्ही लवकरच त्याला अटक करू," अशी माहिती पोलिसांनी दिली.
Web Summary : Enraged by his wife's refusal to return home, a drunk husband set his in-laws' house on fire. While the house was heavily damaged, the family escaped unhurt. Police are searching for the accused husband.
Web Summary : पत्नी के घर लौटने से इनकार करने पर गुस्साए एक शराबी पति ने ससुराल में आग लगा दी। घर को भारी नुकसान हुआ, लेकिन परिवार बाल-बाल बच गया। पुलिस आरोपी पति की तलाश कर रही है।