गुरुग्राम - १० वर्षाच्या मुलीने आईचा फोन पाहता पाहता अचानक तिच्या गॅलरीत असलेले व्हिडिओ पाहिले. त्यानंतर जे घडले त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. फोनच्या गॅलरीतील सत्य उघड होईल या भीतीपोटी आईने आधी पतीला मारले आणि त्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्या हातातूनच पतीला मारले होते. परंतु एका चुकीने ती पकडली गेली. हरियाणाच्या गुरुग्राम पोलिसांनी हत्या प्रकरणात महिलेसह ५ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
माहितीनुसार, पत्नीने कट रचून पती विक्रमची हत्या केली आहे. त्याचे वय ३७ वर्ष होते. तो मूळचा बिहारच्या नवादा इथला रहिवासी होता. विक्रम पत्नी सोनी आणि २ मुलांसह गुरुग्रामच्या उद्योग विहार येथे राहत होता. २८ जुलैला सोनी देवी गुरुग्राम पोलिसांकडे पोहचली आणि पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर ३ दिवसांनी ३१ जुलैला तिने रवींद्र नावाच्या शेजाऱ्याविरोधात बलात्काराचा आरोप केला. मार्च २०२४ मध्ये जेव्हा पती बाहेर गेले होते तेव्हा रवींद्रने माझ्यावर बलात्कार केला आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. रवींद्रने व्हिडिओ बनवला होता आणि हे कुणाला सांगितले तर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं सोनीने पोलिसांना सांगितले.
रवींद्रच्या अटकेनंतर आला ट्विस्ट
सोनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि रवींद्रला अटक केली. त्याने विक्रमच्या हत्येचा गुन्हा कबूल केला. मात्र त्याचवेळी सोनीने त्याला हत्या करण्यास सांगितल्याचे तो म्हणाला. सोनीसोबत खूप दिवसांपासून त्याचे संबंध होते. आता तिच्या मुलीने फोनमध्ये आमचे व्हिडिओ आणि फोटो पाहिले आणि ती वडिलांना सांगणार होती म्हणून सोनीने पती विक्रमला मारण्याचा कट रचला असं आरोपी रवींद्रने दावा केला.
याची चौकशी केली असता रवींद्र आणि सोनी यांच्यात १ वर्षापासून अफेअर सुरू होते. विक्रम जेव्हा ऑफिसला जायचा तेव्हा रवींद्र घरी येत होता. दोघांनी संबंध बनवतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. आता हे व्हिडिओ मुलीने पाहिले होते. परंतु विक्रमला ती काही सांगणार याआधीच सोनीने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. रवींद्र आणि सोनी यांनी इंटरनेट आणि युट्यूबवर हत्या आणि मृतदेह विल्हेवाट कशी लावायची हे प्रकार सर्च केले होते. २६ जुलैला विक्रम जेव्हा ऑफिसहून घरी चालला होता, तेव्हा वाटेत रवींद आणि त्याच्या साथीदारांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर विक्रमची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृतदेह झारसा गावात दफन करण्यात आला. रवींद्रने त्याचा काका संतरपाल याच्या मदतीने खड्डा खणून ठेवला होता. गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी विक्रमचा मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेतला.
प्रियकराला अडकवण्याचं प्लॅनिंग
दरम्यान, विक्रमची हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत सोनी सातत्याने रवींद्रच्या संपर्कात होती. तिने २८ जुलैला पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली मात्र पतीची हत्या २६ जुलैलाच झाली होती. त्यानंतर आपण या हत्येच्या गुन्ह्यात अडकू या भीतीने तिला प्रियकराला अडकवण्याचं प्लॅनिंग केले. आता तपासात सोनीही या हत्येत सहभागी असल्याचे पुरावे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी महिलेसह ५ पुरुषांना अटक केली आहे.