एकीकडे सून ही घराची लक्ष्मी मानली जाते, तर दुसरीकडे पैशांच्या हव्यासापायी याच लक्ष्मीचा बळी घेण्याच्या घटना काही थांबायला तयार नाहीत. पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यातील घोला परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी आणि पैशांच्या वादातून एका नराधम पतीने आपल्या गर्भवती पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह चक्क बेडच्या खाली लपवून ठेवला.
फोन न उचलल्याने संशय बळावला
घोला येथील लेनिनगड परिसरात राहणाऱ्या पूजा मंडल हिचा विवाह ऋषी हरिचंद याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच ऋषीने पूजावर माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पूजाच्या माहेरचे लोक सकाळपासून तिला फोन करत होते, मात्र पूजा फोन उचलत नव्हती. वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्याने घाबरलेले माहेरचे लोक तातडीने तिच्या सासरी पोहोचले.
खाटेखालील दृश्याने उडाली झोप
पूजाच्या माहेरच्यांनी जेव्हा सासरच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा तिथे जे दिसले ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील खाटेखाली कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत पूजाचा मृतदेह पडून होता. आरोपी पतीने पूजाचा गळा आवळून तिची हत्या केली होती आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह खाटेखाली लपवून ठेवला होता. धक्कादायक बाब म्हणजे पूजा गर्भवती होती, तरीही क्रूर ऋषीला तिची दया आली नाही.
पोलिसांची धडक कारवाई: तिघांना बेड्या
या घटनेची माहिती मिळताच घोला पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पूजाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी पती ऋषी हरिचंद, त्याची आई आणि कुटुंबातील आणखी एका सदस्याला अटक केली आहे.
कठोर शिक्षेची मागणी
पूजाला लग्नानंतर सतत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. "आमच्या मुलीचा छळ होत होता हे आम्हाला ठाऊक होतं, पण तिचा जीव घेतला जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं," असा टाहो पूजाच्या आई-वडिलांनी फोडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी परिसरातून होत आहे.
Web Summary : A pregnant woman in West Bengal was murdered by her husband for dowry. Her parents, unable to reach her, found her body hidden under the bed. Police arrested the husband, his mother, and another family member. The family demands justice.
Web Summary : पश्चिम बंगाल में एक गर्भवती महिला की दहेज के लिए उसके पति ने हत्या कर दी। जब माता-पिता उससे संपर्क नहीं कर पाए, तो उन्होंने उसका शव बिस्तर के नीचे छिपा हुआ पाया। पुलिस ने पति, उसकी माँ और एक अन्य परिवार के सदस्य को गिरफ्तार किया। परिवार न्याय की मांग कर रहा है।