मुंबई - चोरीच्या घटना बऱ्याचदा तुम्ही ऐकल्या असतील, परंतु कोट्यवधी संपत्तीचा मालक चोर बनला हे ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. मुंबईसारख्या शहरात फ्लॅट, बिहारमध्ये मोठे घर, शेती, जमीन त्याशिवाय चांगला बँक बॅलेन्स असूनही हा श्रीमंत चोर त्याच्या चोरीच्या सवयीमुळे अडचणीत आला आहे. हा चोर चोरी करताना जी शक्कल लढवायचा ते समोर आल्यानंतर पोलीस शॉक झाले. पोलिसांना चकवा देण्यासाठी चोर चक्क महिलांचे कपडे घालून चोरी करत होता.
मुंबईच्या मालाड परिसरात एका शातीर चोराला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोर पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलांचे कपडे घालून सीसीटीव्ही कॅमेरापासून वाचत रेल्वे ट्रॅकचा वापर करायचा. मालाड पोलिसांनी या चोराकडून सोने वितळवण्याची मशीन, ३६ तोळे सोने, महिलांचे कपडे आणि भरपूर रोकड जप्त केली आहे. या चोराची पार्श्वभूमी तपासात समोर आली तेव्हा सगळेच अवाक् झाले. आरोपी चोराकडे अनेक बंगले, फ्लॅट इतकी संपत्ती आहे. तो अनेक वर्षापासून चोरी करत होता परंतु कधीही तावडीत सापडला नाही. मात्र अलीकडेच मालाड पोलिसांच्या हुशारीने या चोराला जेरबंद करण्यात आले आहे.
बिहारमध्ये राहणारा चोर, ५७ लाख संपत्ती जप्त
आरोपी रंजित कुमार उर्फ मुन्ना हा बिहारच्या बबुआगंज परिसरात राहतो. मालाडच्या मालवणी परिसरातून त्याला अटक केली. आरोपी पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी महिलांचे ड्रेस घालून चोरी करायचा. तो कधी भिकाऱ्याच्या वेशात तर कधी रेल्वे ट्रॅकवरून चोरी करायला जायचा. या आरोपीकडून ५७ लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ज्यात १६ लाखांची रोकड बँकेत गोठवण्यात आली आहे. ४१ लाखांचे दागिने आणि इतर सामान जप्त केले आहे. आतापर्यंत या चोराने ८ चोरी केल्याचे तपासात उघड झाले अशी माहिती मालाडचे एसीपी हेमंत सावंत यांनी दिली.
दरम्यान, मालाड पोलिसांच्या पथकाने रेल्वे ट्रॅकसह जवळपास १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्यातून हा चोर तावडीत सापडला. आरोपी मागील १० वर्षापासून अशाप्रकारे चोरीचे कृत्य करत आहे. मोठ्या चलाखीने त्याने चोरी करून कोट्यवधीचे फ्लॅट, जमीन आणि बंगले कमावले. दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलांचा ड्रेस घालून चोरी करत होता.