मनीषा म्हात्रेमुंबई - विक्रोळीत दाखल केेलेल्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात सहायक पोलिस आयुक्तांना तपासाचे अधिकार असताना उपनिरीक्षकाच्या हाती तपासाची धुरा दिली. प्रकरण अंगलट येताना दिसताच कागदपत्रांमध्येच छेडछाड केल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून मागवलेल्या कागदपत्रांतून समोर येत आहे. पंचनाम्यानुसार, स्वच्छ सूर्यप्रकाशात पंचनामा झाल्याचे नमूद आहे. तर स्टेशन डायरीनुसार एसीपी मात्र संध्याकाळी घटनास्थळी रवाना झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे उपनिरीक्षकाने केलेल्या पंचनाम्यावरच तारखेत खाडाखोड केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
आधीच तपासात होत असलेल्या दिरंगाईमुळे त्रस्त असताना या कागदपत्रांवरून तपासाला गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप तक्रारदार करत आहेत. अशाप्रकारे वरिष्ठ अधिकारीच करायला लागले तर? आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? असा सवालही उपस्थित होत आहे. विक्रोळीतील गणेश घाडगे यांच्यावर गेल्यावर्षी २७ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वा. अफजल निसार शेख ऊर्फ पाया याच्या टोळीने हल्ला करत जातिवाचक शिवीगाळ केली. टागोरनगर भागात सुरू असलेला कामावर प्रत्येक गाडीमागे १८०० रुपये देण्यास नकार दिला म्हणून हा हल्ला करण्यात आला होता.
या प्रकरणात पायासह साकीर शेख, सलीम कुरेशीला अटक केली. तर अन्य साथीदार मोकाट आहेत. पोलिसांच्या तपासाबाबत त्याचे वकील अश्विन भागवत यांनी मागवलेल्या कागदपत्रांत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
तपास केला गेल्या वर्षी, आदेश मात्र या वर्षी माहिती अधिकारानंतर कागदपत्रांमध्ये छेडछाड करत काही कागदपत्रे त्यात घुसविण्यात आल्याचे दिसून येत आहे. २८ डिसेंबर रोजी एसीपींनी पोलिस उपनिरीक्षक योगेश चिंचोले यांना तब्येत ठीक नसल्याने पोलिस ठाण्यास पोहोचण्यास उशीर होईल. त्यामुळे गुन्ह्याचा प्राथमिक तपास करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात ही प्रत २०२५ मध्ये गेल्याचे दिसून येत आहे. या कागदपत्रांवरून तपासावर संशय व्यक्त होत चौकशी करावी, अशी मागणीही भागवत यांनी केली आहे.
...अन् आरोपी झाला गायबहाती लागलेल्या सीसीटीव्हीत घटनेच्या दिवशी घाडगे यांनी ओळखलेल्या आरोपींपैकी गुड्डू अन्सारी, रिझवानही पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र, दोघेही पोलिसांच्या निगराणीत बाहेर पडताना दिसत आहे. आम्ही ओळख करून दिलेल्या आरोपींना पोलिसांनी का सोडले? याचीही चौकशीची मागणी करण्यात येत आहे. याबाबत पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्याकडे विचारणा करताच त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल असे सांगितले.
आधी कॉल, नंतर हल्ला? आरोपींच्या कॉल लॉगनुसार, अटक आरोपी सलीम कुरेशीने ११ वा. १८ मिनिटांनी विक्रोळी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाला कॉल केल्याचे दिसून येत आहे. त्याच्या १२ मिनिटांत साडेअकरा वाजता घाडगेवर हल्ला होताना दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला पोलिसांना अलर्ट देऊनच करण्यात आला का? याचीही चौकशी करण्याची मागणी करत, तक्रारदाराने पोलिस आयुक्तांसह पोलिस उपायुक्तांकडे तक्रार दिली आहे. तसेच काही पाहिजे आरोपी पोलिसांसोबत मोकाट फिरत असून जीवाला धोका असल्याचीही भीतीही घाडगेने वर्तविली आहे.
रात्रीच्या अंधारात सूर्यप्रकाश कुठून आलाभागवत यांच्या म्हणण्यानुसार, ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्तांनी करणे अपेक्षित असताना त्या घटनास्थळी आल्या नाहीत. २८ तारखेला सकाळी उपनिरीक्षक योगेश चिंचोले यांनी पंचनामा केला. त्यात पंचनामा कधी सुरू केला आणि कधी संपला, याची नोंद नाही. तारखेत खाडाखोड करत तो ३० तारखेला झालेला दाखवला. त्यावरील एसीपी प्राची कर्णे यांची सही देखील खोटी असल्याचा संशय आहे. डायरीतील नोंदीनुसार, २९ डिसेंबर रोजी एसीपी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी रवाना झाल्या आणि अर्ध्या तासात परतल्याची नोंद आहे. तिथे कोणी गेलेच नव्हते. घटनास्थळावरील सीसीटीव्हीही पुरावे आहेत.
३० तारखेला सायंकाळी साडेसात वाजता एसीपी या उपनिरीक्षक कोळी सोबत घटनास्थळी पंचनामा झाल्याची नोंद आहे. पंचनाम्यानुसार, सूर्यप्रकाशात पंचनामा करण्यात आला आहे. तर, नोंदीनुसार एसीपी सायंकाळी साडेसात वा. पंचनाम्याला रवाना झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात सूर्यप्रकाश कुठून आला? याचाही तपास होणे गरजेचे आहे.