चिटिंग कंपनीचे आणखी दोन आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:01 AM2020-11-17T05:01:23+5:302020-11-17T05:01:36+5:30
५० कोटींच्या फसवणुकीचा अंदाज; गुरनुले फरारच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाने गुंतवणूक करण्यास बाध्य करणारा मुख्य आरोपी विजय रामदास गुरुनुले (वय ३९) अद्याप फरारच आहे. मात्र, गुरनुलेच्या चिटिंग कंपनीत सेकंड बॉस म्हणून मिरवणारा अविनाश महादुले आणि ऑफिस इन्चार्ज श्रीकांत निखुले या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे.
ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाखाली चिटिंग कंपनी सुरू करून आरोपी गुरुनुले आणि त्याच्या साथीदारांनी शेकडो जणांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र मंदीचे वातावरण असताना गुरुनुलेची चिटिंग कंपनी चांगलीच तेजीत आली होती. अल्पावधीत भरभक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून गुरनुले आणि त्याचे साथीदार गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढत होते. ज्यांनी लाखो रुपये गुंतवले त्यांना सुरुवातीला काही परतावा दिला जायचा. त्यामुळे ही मंडळीही ‘होयबा’ची भूमिका वठवित होती. त्यामुळे गुरनुलेच्या चिटिंग कंपनीत ग्राहकांची संख्या वाढतच होती. शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत केल्यानंतर तो जुन्या ग्राहकांना टाळू लागल्याने फसवणुकीचा प्रकार उघड झाला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो प्रतापनगर पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आरोपी विजय गुरुनुलेचे साथीदार जीवन दंडारे, रमेश बिसेन तसेच अतुल मेश्रामला अटक केली. ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. तर, त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सोमवारी सकाळी आरोपी अविनाश महादुले आणि श्रीकांत निखुले यांना अटक केली.
तपासावर वरिष्ठांची सूक्ष्म नजर
या प्रकरणाच्या तपासावर परिमंडळ एकचे उपायुक्त नुरूल हसन यांची सूक्ष्म नजर आहे. त्यांनी आज महादुले आणि निखुलेची चौकशी केली. त्यानंतर एका फाऊंडर मेंबरसह दोघांना सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात बोलविले. त्यांची चौकशी सुरू होती. रात्रीतून आणखी काही आरोपींना अटक केली जाण्याची शक्यता उपायुक्त नुरुल हसन यांनी वर्तविली आहे.
गुरनुलेलाही लवकरच अटक केली जाईल, असे पोलीस सांगत आहेत. आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी किमान ५० कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी व्यक्त केला आहे.