पटना : केंद्र सरकार वाहतूक नियम पाळण्यासाठी नवनवीन नियम, दहा पट दंड करत आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांना खुलेआम नियम पायदळी तुडविण्याची मुभा असल्याचा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार कोणताही दंड न करता सोडून दिली आहे. याची वाच्यता झाल्याने वरिष्ठ निरिक्षकासह तीन पोलिसांनी निलंबित करण्यात आले आहे. यानंतर लगेचच आणखी एक खासदार रामकृपाल यादव यांच्या कारवर कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी बिहार म्युझियमजवळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत विशेष तपासणी अभियान सुरू करण्यात आले होते. यावेळी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या गाडीला रोखण्यात आले. पुढील सीटवर त्यांचा मुलगा आणि सून सीट बेल्ट न लावताच बसलेले होते. तर मागच्या सीटवर त्यांची पत्नी बसली होती. मंत्र्याचा मुलाने गाडी बिहार म्युझियमच्या गेटपासून 100 मीटरवर थांबविली होती. गाडीचा नंबर तपासला असता ही कार मंत्र्याची असल्याचे लक्षात आले. पोलिस या कारकडे अर्धा तास झाला तरीही फिरकले नव्हते.
पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाल्याचे कळताच अन्य पोलिस सतर्क झाले. याच काळात खासदार रामकृपाल यादव यांची गाडी जात होती. या कारच्या खिडक्यांच्या काचेवर काळी फिल्म लावण्यात आली होती. गाडीमध्ये खासदाराचा मुलगा होता. तो ही सीटबेल्ट न लावताच गाडी चालवत होता. यामुळे पोलिसांनी लगेचच कारवाई करत १ हजार रुपयांचे चलन फाडले.