मनीषा म्हात्रेमुंबई : टोरेस प्रकरणात पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त होताच, थंडावलेल्या आयएक्स ग्लोबल घोटाळ्याच्या तपासाला वेग आला. याच वेगात, तपास अधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून घेण्यासाठी काही जणांना ऑक्टोबरच्या तारखेची नोटीस जानेवारीत पाठविल्याचे समोर आले आहे. तपासच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात डोकं वर काढलेल्या आयएक्स ग्लोबलमध्ये उच्च शिक्षितांना विशेषतः टार्गेट केले आहे. देशभरात याचे जाळे पसरले असून, यामध्ये कमीत कमी २ लाख ते कोट्यवधी रुपयांमध्ये नागरिकांनी पैसे गुंतवले. हजारो कोटींच्या घोटाळ्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे याचा आकडा आणखीन वाढला.
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर, गुंतवणूकदारांना पत्र पाठवून चौकशीला बोलावण्यास सुरुवात झाली. याच प्रकरणात आतापर्यंत ५०० जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, गुन्हा नोंदविल्यानंतर अवघ्या ४० ते ५० जणांचे जबाब नोंदविण्यात आले होते.
गुंतवणूकदारांना संशयबिहारचे प्रवीण चंद्रा यांना यावर्षी १६ जानेवारी रोजी पत्र मिळाले. त्यात, १८ ऑक्टोबर २०२४ च्या तारखेचा उल्लेख आहे. १५ तारखेला ही नोटीस पाठवली, ती १६ ला मिळाल्याचे पोस्टाच्या लेटरवरून स्पष्ट होते. दुसरीकडे मुंबईतील साक्षी नाईक यांच्यासह अनेकांना या तारखेनुसार ऑक्टोबरच्या तारखेचे पत्र हाती आले आहे. कागदोपत्री तपास दाखविण्यासाठी ही धडपड होती का? असाही सवाल उपस्थित करत तपासावरच गुंतवणूकदार संशय व्यक्त करत आहेत.
आरोपींविरुद्ध कडक कारवाई होणे गरजेचे आहे. गुन्हा दाखल होऊन देखील यातील आरोपी नवीन योजना घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. मात्र, या प्रकरणाकडे गांभीर्याने घेतले जात नाही. ईडी, सीबीआयने देखील या प्रकरणी दखल घेत कारवाई करायला हवी. - शम्मीर शेख, गुंतवणूकदार, मुंबई