मुंबई / लखनौ : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने शनिवारी रात्री उशिरा ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतून मोहम्मद अय्यान मोहम्मद हुसैन (२२), अबू सुफियान ताजमुल्ल (२२) व जैद अब्दुल कादिर नोटियार (२२, रा. शांतीनगर) या तिघांना अटक केली. तिघांचा दहशतवादी कारवायांत सहभाग असल्याचा संशय असून, त्यांनी तीन लाख रुपये पॅलेस्टाइनला (गाझा) पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.
२७ ऑगस्टला भिवंडीतून लाखो रुपये पॅलेस्टाइनला पाठविल्याची माहिती यूपी एटीएसला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी भिवंडीत दाखल झालेल्या पथकाने दिवसभर पाळत ठेवली. संशयास्पद हालचालींवरून शनिवारी दुपारी पथकाने गुलजार नगर परिसरातील एका इमारतीवर छापा टाकून अबू सुफियान याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने साथीदार मोहम्मद अय्यान, जैद यांची माहिती दिली. त्यानुसार पथकाने स्थानिक शांतीनगर व निजामपुरा पोलिसांच्या मदतीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
तपासासाठी नेले लखनौला एटीएसने तिघांना ट्रान्झिट रिमांडद्वारे पुढील तपासासाठी लखनौ येथील एटीएस कार्यालयात नेल्याची माहिती शांतीनगरच्या पोलिस सूत्रांनी दिली. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास स्थानिक पातळीवरही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे दहशतवादी कारवायांचे धागेदोरे महाराष्ट्राशी जुळल्याचे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात दिल्ली पोलिसांनी अंबरनाथमधील नेवाळी नाका येथून आफताब कुरेशी या संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. त्यानंतर भिवंडीतून तिघांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक पोलिस म्हणतात, आम्हाला फार माहिती नाहीउत्तर प्रदेश पोलिसांनी लखनौ न्यायालयाचे तिन्ही आरोपींबाबतचे अटक वॉरंट दिल्याने शांतीनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना पकडण्यात उत्तर प्रदेश पोलिसांची मदत केली. या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश पोलिस करत असल्याने या प्रकरणाची फारशी माहिती आम्हाला नाही. ते कुठे आर्थिक देवाणघेवाण करत होते याबाबतची माहिती आम्हाला नाही, अशी प्रतिक्रिया शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.