लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. सानपाडा येथील फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, शंकर कोठेकर (३५), संदीप देवगडे (३५) व भारत रुडे (२०) या तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे तीन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.
आयपीएलच्या सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात आहे का, याचा आढावा पोलिसांकडून घेतला जात होता. त्यामध्ये सानपाडा येथून एक टोळी सट्टा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाला मिळाली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक नीलेश बनकर, उपनिरीक्षक प्रशांत कुंभार यांचे पथक केले. त्यांनी बुधवारी रात्री सानपाडा सेक्टर १४ येथील अखुरथ सोसायटीमधील एका घरावर छापा टाकला असता, तिथे चाललेला सट्टा उघडकीस आला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स या संघांच्या सामन्यावर संबंधितांनी सट्टा लावला होता.