लखनौमध्ये रविवारी संध्याकाळी एका बँकेच्या लॉकरमधून दागिण्यांची मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. येथील चिनहट पोलीस स्टेशन हद्दीतील अयोध्या हायवेच्या बाजूला असलेल्या इंडियन ओव्हरसीज बँकेत ही घटना घडली. बँक मॅनेजरने बँकेत चोरी झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या मागील बाजूने चोरट्यांनी आधी भिंत फोडली. त्यानंतर चोरट्यांनी बँकेची लॉकर रूम गॅस कटरने कापली. या रुममधील ९० पैकी सुमारे ४२ लॉकरही कापले. यावेळी चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले कोट्यवधींचे दागिने चोरून नेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांव्यतिरिक्त असे ग्राहकही सुट्टीच्या दिवशी बँकेत पोहोचले, ज्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून बनवलेले दागिने आणि वडिलोपार्जित दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. दरम्यान, सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना बँकेत लावण्यात आलेले चार सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. चार सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोर बँकेच्या बाहेर पहारा देताना दिसत आहे, तर इतर तीन जण बँकेत शिरताना दिसत आहेत.