विज्ञानाच्या युगातही अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचे एक भयंकर उदाहरण उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातून समोर आले आहे. सर्पदंश झालेल्या एका १३ वर्षीय मुलाला वेळेवर रुग्णालयात नेण्याऐवजी, त्याच्या कुटुंबीयांनी चक्क १२ तास झाडफुंकी आणि अघोरी उपचारांचा आधार घेतला. मुलाला काठी आणि दोरीच्या सहाय्याने बांधून गंगा नदीच्या वाहत्या पात्रात लटकवून ठेवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या अघोरी प्रकारात मुलाने आपला जीव गमावला आहे.
नेमकी घटना काय?
अमरोहा जिल्ह्यातील आदमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीतमपूर गावात ही घटना घडली. १३ वर्षांचा हा मुलगा घरातून भुसा काढण्यासाठी गेला असताना त्याला विषारी सापाने दंश केला. मुलगा बेशुद्ध पडल्यानंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे नेणे अपेक्षित होते. मात्र, गावकऱ्यांच्या आणि अंधश्रद्धेच्या सल्ल्यानुसार त्यांनी मुलाला गंगा नदीवर नेले.
१२ तास मृत्यूशी झुंज अन् गंगेत लटकवलेलं शरीर
सोशल मीडियावर या घटनेचा एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसून येते की, मुलाचे हात-पाय एका लाकडी दांड्याला बांधून त्याला गंगेच्या पाण्यात लटकवण्यात आले आहे. 'नदीच्या पाण्याने आणि झाडफुंकीने अंगातील विष उतरते', या अंधश्रद्धेपोटी हा प्रकार करण्यात आला. तब्बल १२ तास हा जीवघेणा खेळ सुरू होता. यादरम्यान मुलाला योग्य उपचार न मिळाल्याने त्याची प्राणज्योत मालवली.
अंत्यसंस्कार करण्याऐवजी शव नदीत सोडले
मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबीयांची अंधश्रद्धा संपली नाही. त्यांनी नियमानुसार अंत्यसंस्कार करण्याऐवजी मुलाचे पार्थिव गंगेच्या पात्रातच वाहून दिले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. शशांक चौधरी यांनी स्पष्ट केले की, मुलाला कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले नव्हते. वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित या चिमुरड्याचा जीव वाचला असता. अंधश्रद्धेमुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील आरोग्य जनजागृतीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a snakebite victim was hung in the Ganges for 12 hours instead of receiving medical treatment. The 13-year-old boy died due to superstitious practices. His body was released into the river, highlighting the need for rural health awareness.
Web Summary : उत्तर प्रदेश में, अंधविश्वास के चलते सांप काटने के बाद एक बच्चे को इलाज के बजाय 12 घंटे गंगा में लटकाया गया, जिससे उसकी मौत हो गई. लड़के के शव को नदी में बहा दिया गया. यह घटना ग्रामीण स्वास्थ्य जागरूकता की आवश्यकता पर प्रकाश डालती है.