उल्हासनगर : मध्यवर्ती, विठ्ठलवाडी व हिललाईन पोलिसांनी गेल्या ३ दिवसात तब्बल ९ बांगलादेशी नागरिकांना अटक करून गुन्हा दाखल केला. मंगळवारी ४, बुधवारी ३ तर गुरुवारी २ अश्या ९ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून शहरात बांगलादेशी नागरिकांची संख्या मोठी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
शहरातील मध्यवर्ती व विठ्ठलवाडी पोलिसांनी मंगळवारी एकूण ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. तर बुधवारी कॅम्प नं-३, फॉरवर्ड लाईन परिसरातील कंवाराम पॅलेस इमारतीमधून जन्नतउल फिरदोस अबुल हाशिम व नासरीन अख्तर नासीर शेख या बांगलादेशी नागरिकाना अटक करून गुन्हा दाखल केला. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी मराठा सेकशन येथूण नूर मोनू पठाण या बांगलादेशी नागरिकाला अटक करून गुन्हा दाखल केला. त्याला येथे राहण्यास व येण्यास मदत करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत. गुरुवारी हिललाईन पोलिसांनी गणेश चाळ हाजी मलंग रस्ता येथून अश्ररफ अब्दुल हसन मंडळ या बांगलादेशी नागरिकाला अटक करून गुन्हा दाखल केला. तर विठ्ठलवाडी पोलिसांनी बंजारा कॉलनीतून शर्मिन अख्तर अब्दुल खलील या बांगलादेशी महिलेला अटक करून गुन्हा दाखल केला.
शहरातील विविध पोलीस ठाण्यात गेल्या ४ महिन्यात ४५ पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केल्याची नोंद आहे. पोलीस झाडाझाडतीत बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरु असून गेल्या तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. झोपडपट्टी, कारखाने, मुख्य बाजार, इमारत बांधकाम साईट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असून पोलिसांनी झाडाझडती घेतल्यास मोठया प्रमाणात बांगलादेशी नागरिक सापडतील.