छत्तीसगडमधील कोरबामध्ये २४ डिसेंबर २०२२ झालेलं हत्याकांड आजही देश विसरू शकलेला नाही. या गावात त्यादिवशी एका तरुणीची अतियश क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. अहमदाबादमध्ये राहणारा सहबान खान त्याच्या गर्लफ्रेंडवरील संशयामुळे रागात इतका बेफान झाला की, त्याने आधी २० वर्षांच्या गर्लफ्रेंडवर बलात्कार केला आणि नंतर तिच्या छातीत तब्बल ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली असून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी सहबान खान हा अहमदाबादमधून जयपूरला आला होता. जयपूरमध्ये भाड्याने घर घेऊन तो चिश्तीमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत होता. या दरम्यान मदनपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली. ही तरुणी याच बमधून प्रवास करायची. त्यामुळे दोघांची ओळख झाली अन् हळूहळू प्रेम फुलू लागले. सहबानने मनातल्या मनात लग्नाचा प्लॅन देखील बनवून टाकला होता. मात्र, या दरम्यान ती तरुणी दुसऱ्या एका मुलाशी बोलू लागली. यामुळे सहबानला राग आला. त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, इतकंच काय तर, त्याने तिच्या आईला देखील धमकावले.
हत्येचा कट रचला अन्...
संशयाच्या भरात, सहबानने हत्येचा कट रचला. २४ डिसेंबर २०२२ रोजी त्याने अहमदाबादहून रायपूरला जाण्यासाठी विमान पकडले आणि तेथून तो कोरबा येथे आला. हॉटेल सलीममध्ये राहिल्यानंतर, तो संधी साधून मैत्रिणीच्या घरी पोहोचला. या दरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात, सहबानने प्रथम तरुणीवर बलात्कार केला आणि नंतर स्क्रूड्रायव्हर उचलला आणि तिच्या छातीवर ५१ वेळा खुपसला. घटनेच्या वेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते. मुलीचा जागीच मृत्यू झाला.
रक्ताने माखलेला मृतदेह आढळलाकाही वेळाने घरी पोहोचलेल्या भावाला त्याची बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानेच पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. तपासादरम्यान घटनास्थळावरून रक्ताने माखलेले बूट, शर्ट, इअरफोन आणि कंडोमचे पॅकेट जप्त करण्यात आले. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आणि सुमारे दीड महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर आरोपीला गुजरातमधून अटक करून कोरबा येथे आणण्यात आले. चौकशीदरम्यान सहबानने आपला गुन्हा कबूल केला.
जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जयदीप गर्ग यांच्या न्यायालयाने सेहबान खानला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि ७५,००० रुपये दंडही ठोठावला.