नोएडामध्ये हुंड्यासाठी पत्नी निक्कीला पतीनेच जाळून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणाने खळबळ उडाली. तिचा पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करायचे असा आरोप आहे. ते तिला मारहाण करायचे. तिच्या पतीने तिला इतका मारहाण केली की ती बेशुद्ध पडली, नंतर त्याने तिला जाळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळी झाडली. दरम्यान, आता निक्कीचा पती विपिन भाटीचा पहिला जबाब समोर आला आहे.
विपिन भाटीला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात होते पण यादरम्यान विपिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
रुग्णालयात माध्यमांशी बोलताना विपिन भाटी म्हणाला की, मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी तिला मारले नाही. ती स्वतःहून मरण पावली. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होतात, ही एक सामान्य गोष्ट आहे.
दुसरीकडे, मृत निकीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, माझ्या मोठ्या मुलीने मला फोन करून सांगितले की, आम्ही रुग्णालयात पोहोचलो. या लोकांनी तिला आग लावली आणि पळून गेले. तिच्या शेजाऱ्यांनी तिला फोर्टिस रुग्णालयात नेले. आम्ही पोहोचलो तेव्हा ती ७०% भाजली होती. त्यांनी तिला सफदरजंग रुग्णालयात रेफर केले. आम्ही रुग्णवाहिका बुक केली आणि तिला सफदरजंग रुग्णालयात नेले, तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. या लोकांनी कोणाच्या मुलीशी असे करण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही. आम्ही तिला कसे शिक्षण दिले आणि तिचे लग्न कसे केले याचा त्यांनी विचारही केला नाही. कोणाच्या मुलीला आग लावताना त्यांना वेदना झाल्या नाहीत का?, असंही ते म्हणाले.
वडिलांनी आरोपींना फाशीची मागणी केली. तिच्या सासूने तिच्यावर रॉकेल ओतले आणि तिच्या पतीने तिला जाळून टाकले. ते हुंडा मागत राहिले, आता त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. मी माझ्या मुलीशी रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. आता माझी मुलगी मरण पावली आहे, त्यांच्या हुंड्याच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. ती माणस नाहीत, ती कसाई आहे.