आंध्र प्रदेशमध्ये विवाह संस्थेच्या माध्यमातून फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाला एका तरुणीने लग्नासाठी विवाह संस्थेमध्ये चार लाख रुपये जमा करायला लावले. त्यानंतर त्यांचे लग्न झाले आणि दोघे २० दिवस एकत्र राहिले. पण नंतर ती तरुणी अचानक पळून गेली आणि परतलीच नाही. तरुणाने तिला आणि तिच्या ओळखीच्या दोन लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे मोबाईल नंबर बंद होते.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत तरुणाची फसवणूक करणाऱ्या तरुणीला आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. फसवणुकीची ही घटना कुरनूल जिल्ह्यातील होलागुंडा मंडलातील मुड्डाटा मागी गावात घडली आहे. पीडित तरुणाचे नाव कार्तिक असून, तो याच गावाचा रहिवासी आहे.
विवाह संस्थेने करून दिली होती ओळख!कार्तिकचे लग्न होत नव्हते. त्यामुळे त्याने ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील राजमुंदरी येथील एका विवाह संस्थेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले. त्यानंतर त्याने त्या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या लोकांनी त्याला लवकरच लग्न जमवून देण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनी संस्थेने त्याची एका तरुणीशी ओळख करून दिली. त्यानंतर कार्तिक आणि ती तरुणी एकमेकांशी बोलू लागले.
अल्पावधीतच कार्तिक त्या तरुणीच्या प्रेमात पडला. याचदरम्यान, तरुणीने बोलता बोलता त्याला सांगितले की विवाह संस्थेने तिच्याकडून चार लाख रुपयांची मागणी केली आहे आणि पैसे दिल्याशिवाय लग्न होऊ शकणार नाही. तरुणीच्या सांगण्यावरून कार्तिकने विवाह संस्थेला चार लाख रुपये रोख दिले. त्यानंतर दोघांचे लग्न झाले.
२० दिवस एकत्र राहिल्यानंतर वधू फरार!लग्नानंतर दोघे २० दिवस एकत्र राहिले. एक दिवस कार्तिकची पत्नी त्याला म्हणाली की, ती राजमुंदरीला जात आहे आणि लवकरच परत येईन. मात्र, त्यानंतर ती परतलीच नाही. कार्तिकने तिला आणि तिच्या ओळखीच्या दोन लोकांना फोन केले, पण त्यांचे नंबर उपलब्ध नव्हते. त्यानंतर कार्तिकने तात्काळ होलागुंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासणीचा वापर करत राजमुंदरी येथून सर्व आरोपींना अटक केली.