चेन्नईमधील उद्योजक प्रसन्ना शंकर यांनी त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप लावले आहेत. सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून प्रसन्ना यांनी पत्नीवर लग्नानंतरही अफेअर करत असल्याचा आरोप केला आहे. त्याशिवाय घटस्फोटाची मागणी करताच पत्नीने मोठी रक्कम मागितली. चेन्नई पोलिसांना हाताशी धरून ती माझा छळ करत आहे असा आरोप प्रसन्ना शंकर यांनी लावला आहे. प्रसन्ना शंकर हे सिंगापूर बेस्ड क्रिप्टो सोशल नेटवर्कचे फाऊंडर आहेत. ते पत्नी दिव्यापासून वेगळे राहत आहेत.
प्रसन्ना शंकर यांनी सोशल मीडियात पोस्ट करून म्हटलं की, जेव्हा मला माझ्या पत्नीच्या अफेअरबद्दल कळलं तेव्हा तीच माझा छळ करू लागली. माझ्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. पोलिसांत खोट्या तक्रारी दाखल केल्या. तिने भारताऐवजी अमेरिकेन कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दिला. पत्नीने माझ्या ९ वर्षीय मुलाला अमेरिकेत लपवलं आहे असं त्यांनी सांगितले. प्रसन्ना यांनी पत्नीवर मुलाच्या अपहरणाचाही गुन्हा नोंदवला आहे. एका अमेरिकन कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला, त्यानंतर दोघांनी एका करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार आमच्या दोघांना मुलाची संयुक्त कस्टडी मिळाली परंतु मला पत्नीला ९ कोटी किंवा ४.३० लाख महिना पोटगी द्यायची होती असं त्यांनी सांगितले.
तर कोर्टाच्या कराराचं पालन करण्यास पत्नीने नकार दिला आहे आणि मुलाला स्वत:कडेच ठेवले आहे. याबाबत कोर्टाचे दरवाजे ठोठावले त्यानंतर प्रकरण आणखी बिघडले. पत्नी दिव्याने चेन्नईत मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. माझा मुलगा सुरक्षित आणि आनंदी आहे असं पोलिसांना सांगितले तरीही पोलीस अधिकारी माझ्या कुटुंबावर आणि मित्रांवर दबाव टाकून शोध जारी ठेवला आहे. चेन्नई पोलिसांनी विना परवानगी बंगळुरूतील माझा मित्र गोकुलच्या घरी धाड टाकली आणि त्याला ताब्यात घेतले आहे.
बहाण्यानं बोलावलं अन् मुलाला हिसकावलं
दरम्यान, पत्नीने पतीचा दावा फेटाळत त्याच्यावर आरोप केला आहे. ३ आठवड्यापूर्वी पती प्रसन्नाने मला संपत्तीच्या वाटणीच्या बहाण्याने भारतात बोलावले आणि माझ्याकडून मुलाला हिसकावून घेतले. माझ्या मुलासोबत काय झालंय मला माहिती नाही. त्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पतीने माझ्या मुलाचा पासपोर्टही चोरला होता असं पत्नी दिव्याने आरोप केला आहे. त्याशिवाय टॅक्स वाचवण्यासाठी वैवाहिक संपत्ती त्याच्या वडिलांच्या नावावर केल्याचं पत्नीने म्हटलं आहे.
महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप
प्रसन्ना शंकरवर महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. तो महिलांचे गुप्त व्हिडिओ रेकॉर्ड करतो. सिंगापूर पोलिसांनीही त्याला एकदा अटक केली होती. प्रसन्ना एका स्टिंग ऑपरेशनमध्ये वेश्या व्यवसाय करताना अटक झाला होता. त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकले होते असा आरोप पत्नी दिव्याने केला.