भिवंडी : ओला टॅक्सीचालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या केल्याची घटना मुंबई - नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पुलाखाली घडली. याप्रकरणी रविवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रभाकर गंजी (४३) असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे. प्रभाकर हा लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटुंबाच्या उपजीविकेसाठी ओला कारवर एक ते दीड महिन्यापासून काम करीत होता. ३१ जुलै रोजी दुपारपासून प्रभाकरची कार माणकोली नाक्यावरील पुलाखाली उभी होती. बराच वेळ झाला तरी प्रभाकर याची कोणतीही हालचाल होत नसल्याने नागरिकांना संशय आला. या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी सकाळी मिळाल्याने वाहतूक पोलिसांनी पहिले असता प्रभाकर मृत अवस्थेत दिसला. त्यानंतर नारपोली पोलिसांनी मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. प्रभाकरच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडीत टॅक्सीचालकाची कारमध्येच गळा आवळून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 11:12 IST