पुणे - स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे कारनामे न सांगण्यासारखे आहेत. तपासात गाडेचे अनेक कारनामे उघड झालेत. त्यात गाडे हा स्त्रीलंपट असून तो तृतीयपंथीयांशीही संबंध ठेवायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपीने पोलीस तपासात अनेकदा घुमजाव केले. सुरूवातीला त्याने आपण शरीर संबंध ठेवण्यास सक्षम नसल्याचं पोलिसांना सांगितले होते तर पीडित तरूणीवरच आरोप करत तिला दोषी ठरवण्याचा प्रयत्नही केला.
या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात आरोपीने केलेले दावे फोल ठरल्याचं दिसते. आरोपीने पैसे देऊन संबंध ठेवल्याच्या वकिलाच्या दाव्यातही कोणतेही तथ्य आढळले नाही. मात्र हे आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पीडितेला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. मात्र आरोपीच्या आणि त्याच्या वकिलाने केलेल्या दाव्यावरून एका राजकीय पक्षाच्या महिला नेत्यानेदेखील पीडितेवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला होता.
जिवाच्या भीतीने पीडितेने प्रतिकार केला नाही
पीडितेवर अत्याचार झाला नसून संगनमताने हा प्रकार घडल्याचा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. त्यानंतर आरोपीची आई आणि बायको यांनीदेखील कपडे फाटले का, नखांनी ओरबडले का असे प्रश्न उपस्थित करून एकप्रकारे आरोपीचे समर्थन केले. मात्र असे कृत्य केले तरच बलात्कार होतो असे नाही तर जिवाच्या भीतीने पीडितेने त्याला प्रतिकार केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पीडितेचे चारित्र्यहनन रोखा, सरोदेंचा कोर्टात अर्ज
या घटनेतील पीडितेचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये सोशल मीडियासह सार्वजनिकरित्या केली जात आहेत. त्या विधानांचा पीडितेच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पीडितेचे चारित्र्यहनन रोखण्यासाठी न्यायालयाने प्रतिबंधात्मक आदेश द्यावेत असा अर्ज वकील असीम सरोदे यांनी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केला आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी न्यायालयात घडलेल्या घटनांचे वृत्तांकन केले पाहिजे. परंतु काही राजकारणी, अधिकारी आदी काही व्यक्ती खोट्या बातम्या पसरवत आहेत. न्याय मागण्यासाठी अर्ज करणाऱ्या पीडितेचे चारित्र्यहनन केले जातंय असं सरोदेंनी म्हटलं.