सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच प्रतीक हरिदास निंबाळकर उर्फ पपई(वय २८, रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले.ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता. याच खुनाचा बदला म्हणून प्रतिकचा खून करण्याचा प्रयत्न झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अकरा वाजता भूषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा याचा इंद्रप्रस्थ नगरात खून झाला होता. या गुन्ह्यात प्रतिक याला ९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.१५ वाजता कारागृहातून सुटका झाली. भाऊ वैभव निंबाळकर याच्यासोबत दुचाकीने घरी येत असताना नूतन मराठा महाविद्यालयाच्या समोरील गल्लीतून शाहू नगराकडून जात असताना चार जणांनी दुचाकी अडवून प्रतीकवर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात जबर मार बसल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. तो मृत झाला असे समजून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. भावाने त्याला नजीकच असलेल्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र त्यांनी तेथून शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने रिक्षातून त्याला जीएमसीत हलविण्यात आले. त्याची कवटी फुटली असून डोक्यावर खोलवर जखमा आहेत. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.