लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिशा सालियनची हत्या झाली असून, त्यात आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या आरोपाची चौकशी राज्य सरकारने या प्रकरणात आधीच नेमलेल्या एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधानसभेत केली.
शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य यांच्यावर दिशाच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित केला. तिच्या आई-वडिलांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन थेट आदित्य यांच्यावर आरोप केलेले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संबंध असल्याचा आरोप करून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला गेला होता, त्यांनी राजीनामा दिला देखील. आता दिशा प्रकरणात आरोप झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून आदित्य ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
गायकवाड बोलत नाहीत तोच सत्तापक्षाचे आमदार वेलमध्ये उतरले आणि त्यांनी गदारोळ सुरू केला. हे काय आहे? असा प्रश्न अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला. विरोधी बाकावर ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील, भास्कर जाधव उभे राहिले. इटलीचे राजदूत सभागृहाचे कामकाज बघण्यासाठी पाहुण्यांच्या दीर्धेत बसलेले आहेत, निदान त्यांच्यासमोर तरी गोंधळ करू नका. त्यांना जाऊ द्या मग काय ते करा, असे जयंत पाटील म्हणाले. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.
'कोणालाही सोडणार नाही'
कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंवर काय कारवाई करणार, असा प्रश्न केला. त्यावर मंत्री देसाई म्हणाले की, दिशाप्रकरणी स्थापन केलेली एसआयटी बंद केलेली नाही, या एसआयटीसमोर त्यांच्या आरोपांची माहिती दिली जाईल. ठराविक व्यक्तीबाबत काही आरोप या प्रकरणात झालेले आहेत, त्या आरोपांचीही चौकशी एसआयटी करेल. नेमके काय आरोप केलेले आहेत, याची माहिती पोलिस आयुक्तांकडून घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
तसेच, न्यायालयानेही काही विचारणा सरकारला केली, तर सरकारकडून माहिती दिली जाईल. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आधीच विधान परिषदेत सांगितले आहे, असेही देसाई म्हणाले.