लग्न समारंभात बऱ्याचदा एकमेकांसोबत मजा मस्करी सुरू असते परंतु उत्तर प्रदेशातील बिजनौर इथं बूट चोरण्याच्या प्रथेवरून इतका मोठा कांड झाला, ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. मेहुणीनं जेव्हा नव्या दाजींकडे पैसे मागितले तेव्हा त्यांना हात आखडता घेतला. मग काय त्यावरूनच लग्न मंडपात सुरू असलेली मजा मस्करीचं रुपांतर हाणामारीत झाले. सगळेच एकमेकांना भिडले आणि राडा झाला.
नेमकं काय आहे प्रकरण?
देहारादूनवरून मोहम्मद साबिर वऱ्हाड घेऊन बिजनौरच्या गढमलपूर येथे पोहचले होते. सर्व काही आनंदात सुरू होते. लग्नात बँड बाजा, ढोल ताशे, नाचणे गाणे असं जल्लोषाचं वातावरण होते. परंतु लग्नविधी सुरू झाल्या आणि त्यानंतर नवरदेवाचे बूट चोरण्याची प्रथा आली तेव्हाच वादाची ठिणगी पडली. मेहुणीने परंपरेनुसार नवऱ्याचे बूट चोरले, त्या बदल्यात नवरदेवाकडे तब्बल ५० हजारांची मागणी केली. नवरदेवही हट्टी निघाला त्याने ५ हजार रुपये घ्या नाहीतर बूट ठेवा असं म्हटलं. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला. हा वाद इतका बिघडला की बूट बाजूला राहिले हातात लाठ्याकाठ्या आल्या.
नवरीकडच्या काहींनी नवऱ्याला भिकारी म्हटलं त्यावरून नवऱ्याकडचे चांगलेच संतापले. हा वाद वाढून हाणामारीपर्यंत पोहचला. लाठ्याकाठ्या चालल्या, नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना खोलीत डांबून ठेवण्यात आले. २ गटात हाणामारीनंतर जशी तणावाची स्थिती बनते तसं लग्न मंडपात झाले. या घटनेनंतर नवऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यात नवऱ्याने घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. या पोस्टमध्ये बूट चोरी प्रथेचा बळी पडलेला नवरा असा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर नवरदेव नाराज झाला आणि त्याने नवरीला सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. त्यावेळी नवरीकडील कुटुंबांनी गुंडांना बोलावून वऱ्हाडाला बंधक बनवले. नवऱ्याचे वडील, आजोबा, भाऊ, दाजी सर्वांना मारहाण करण्यात आली. ही घटना समजताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बंधक वऱ्हाडी मंडळींना बाहेर काढले. पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी केली, दोन्ही बाजूच्या लोकांना स्टेशनला आणले. तिथे दोघांमधील वाद सामंजस्याने सोडवण्यात आले. झाले गेले विसरून जा असं सांगत वाद मिटवण्यात आला.