'साली आधी घरवाली' असं गंमतीने म्हणतात. पण, भावोजी आणि मेहुणीचं नातं तसं गंमतीशीर आणि भावनिक मानलं जातं. मात्र, या नात्यालाच काही लोक कलंक लावतात. बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका भावोजी आणि मेहुणीने नात्यांच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. दोघांनी एकमेकांचा हात धरून घरातून पळ काढला. इतकंच नाही तर, पळून जाताना घरातील लाखो रुपयांची रोख रक्कम आणि दागिनेही सोबत नेले. या घटनेनंतर पतीने पोलिसांकडे धाव घेत टाहो फोडला आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना भभुआ शहरातील एका गावातील आहे. एका व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, त्याची पत्नी त्याच्या 'साडू'सोबत पळून गेली आहे. तक्रारीनुसार, पत्नीने घरून तब्बल एक लाख रुपये रोख आणि दोन लाख रुपयांचे दागिने चोरले. पत्नी रात्रीच्या वेळी कोणालाही न कळवता घरातून पळून गेली, त्यामुळे सुरुवातीला कोणालाच संशय आला नाही.
शोध मोहीम आणि रंगला थरार
सकाळी जेव्हा पत्नी घरात दिसली नाही, तेव्हा तिच्या पतीने तिचा सर्वत्र शोध घेतला. पण ती कुठेच सापडली नाही. अखेर, ती तिच्या भावोजीसोबत पळून गेल्याचे त्याला समजले. हताश झालेल्या पतीने थेट पोलीस ठाणे गाठले. "साहेब! माझी इज्जत गेली, मी उद्ध्वस्त झालो. समाजात माझी बदनामी होत आहे. कृपया तिला शोधून काढा," अशी गयावया त्याने पोलिसांसमोर केली.
पीडित पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि दोघांचा शोध सुरू केला. पोलीस तपासात, ती मोहनिया गावातील भावोजीच्या घरी पळून गेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी नातेवाईकांकडून अधिक माहिती गोळा केली आणि त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे दोघांनाही ताब्यात घेतले.
दोघांनाही पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजूतदारपणा दाखवल्यानंतर अखेर पत्नी आपल्या पतीकडे परतण्यास तयार झाली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीला तिच्या पतीच्या ताब्यात दिले.