Crime News : कासार वडवली गावात एका इमारतीमधील खोलीत देहव्यापार सुरू असल्याची धक्कादायक बाब पोलिस कारवाईत निदर्शनास आली. देह व्यापार करणाऱ्या दलाल महिलेला ठाणे शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. दोन महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. अन्य एका घटनेत तीन रशियन आणि एक भारतीय अशा चार महिलांची सुटका करण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले. ही कारवाई वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने आणि पोलिस निरीक्षक प्रवीण सावंत यांच्या पथकाने केली.
कासार वडवली गावातील एका इमारतीत देहव्यापार सुरू असल्याची माहिती ठाणे शहर पोलिस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळाली. बोगस ग्राहक पाठवून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देहव्यापारात ओढल्या गेलेल्या दोन महिलांची पोलिसांनी सुटका करत दलाल महिलेला जेरबंद केले. याप्रकरणी कासार वडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दुसऱ्या घटनेत तीन रशियन आणि एक भारतीय अशा चार महिलांची सुटका करण्यात आली. मुंबईतील ७ ते ८ दलालांच्या टोळीचा शोध वागळे इस्टेट पोलिस घेत आहेत.
दरम्यान, ही कारवाई शनिवारी मध्यरात्री वागळे इस्टेट परिसरातील फ्यूजन ढाब्याजवळ केल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली. वागळे इस्टेट रोड नंबर १६ या ठिकाणी असलेल्या फ्यूजन ढाब्याजवळ मुंबईतील जुहू येथील दलाल व्हॉट्स अॅपवर रशियन आणि भारतीय महिलांचे फोटो पाठवून त्यांच्यामार्फत देहव्यापार करत आहे.