पिंपरी : दापोडी-सांगवी रस्त्यावरील रोडवरील एसटी वर्कशॉपच्या जवळ उघड्यावरील कचऱ्यात एक कुजलेल्या अवस्थेतील अर्भक सापडले. मंगळवारी (दि. १९) दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील एसटी वर्कशॉपच्या जवळ एक मृत अर्भक असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी अर्भकाचे पाय आणि शरीराचा काही भाग कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
मिळालेल्या अवयवांवरून मयत अर्भक हे स्त्री जातीचे आहे की पुरूष जातीचे आहे हे समजू शकले नाही. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर हे अर्भक किती दिवसांचे आहे, हे स्पष्ट होऊ शकते. अर्भक कोणी आणून टाकले, याचा पोलीस शोध घेत आहेत.
घटनास्थळाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविराेधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.