बेंगळुरूच्या सिद्धेहल्ली भागात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर टॉयलेट क्लीनर अॅसिड फेकल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १९ मे रोजी सकाळी ९ वाजता एनएमएच लेआउट येथे घडली. पती दारूच्या नशेत होता आणि त्याच्या मोबाईल फोनवर मोठ्याने गाणी वाजवत होता. पत्नीने त्याला आवाज कमी करण्यास सांगितले, तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पतीने बाथरूममधला टॉयलेट क्लीनर उचलला आणि तो पत्नीच्या चेहऱ्यावर फेकला.
या घटनेत महिलेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. पीडित महिला ब्युटीशियन म्हणून काम करत होती. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा नवरा तिच्याकडे अनेकदा दारूसाठी पैसे मागत असे आणि नकार दिल्यावर तिला त्रास देत असे. घटनेच्या दिवशीही त्याने दारूसाठी पैसे मागितले आणि दारू पिऊन परतल्यानंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवू लागला. जेव्हा त्याच्या पत्नीने विरोध केला तेव्हा तो चिडला आणि त्याने तिच्यावर अॅसिड असणारे टॉयलेट क्लीनर ओतले.
सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्नपीडितेने असा आरोपही केला आहे की, ही पहिलीच घटना नाही. तिच्या पतीने तिला यापूर्वी बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिली होती. त्याने महिलेचे फोटो आणि नाव वापरून सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. एवढेच नाही तर तो तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देत असे आणि तिच्या एका महिला मैत्रिणीलाही धमकी देत असे. या भीतीमुळे ती सतत मानसिक तणावाखाली राहत असल्याचे पीडितेने सांगितले.
या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू केला आहे. सध्या आरोपी पती फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.