मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये संपत्ती आणि पैशासाठी मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे कॉलनीत घडलेल्या या भयंकर घटनेत आता न्यायालयाने आरोपी मुलाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. २० वर्षांपूर्वी एका अनाथाश्रमातून दत्तक घेतलेल्या दीपक पचौरीने स्वतःची आई उषा देवीची हत्या केली. त्याने आपल्या आईची ३२ लाखांची एफडी आणि संपत्तीच्या नादात हा भयंकर कट रचला.
६ मे २०२४ रोजी दीपकने कोतवाली पोलीस ठाण्यात त्याची आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्याने सांगितलं की त्याची आई रुग्णालयात गेली होती पण परत आलीच नाही. पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटलं तेव्हा अधिक चौकशी सुरू करण्यात आली. पोलिसांनी त्याची पुन्हा कसून चौकशी केली तेव्हा दीपक वारंवार त्याचा जबाब बदलत राहिला. पण त्यानंतर त्याने कबूल केलं की त्यानेच त्याच्या आईची हत्या केली आणि मृतदेह घराच्या बाथरूममध्ये जमिनीखाली पुरला.
दीपकने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बाथरूममधून मृतदेह ताब्यात घेतला. बुधवारी विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच परिसरात एकच खळबळ उडाली.
राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर दीपकने शेअर बाजारात १८ लाख रुपये गुंतवले होते, ज्यामध्ये त्याचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर त्याची नजर त्याच्या आईच्या एफडी आणि मालमत्तेवर पडली. पैसे मिळवण्यासाठी त्याने आईचाच काटा काढण्याचा भयंकर कट रचला.