लग्नाच्या आणाभाका घ्यायच्या, सुखाचा संसार मांडायची स्वप्नं दाखवायची आणि काही दिवसातच पतीच्या संपत्तीवर डल्ला मारून पोबारा करायचा... एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये समोर आला आहे. हसीना नावाच्या एका महिलेने चक्क एकापाठोपाठ पाच पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढले आणि विना घटस्फोट पाच निकाह उरकले. मात्र, कायद्याच्या कचाट्यातून ही लुटेरी दुल्हन सुटू शकली नाही. भोपाळ जिल्हा न्यायालयाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हसीनाला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हसीना नावाची ही महिला जाणीवपूर्वक अशा पुरुषांना शोधायची जे आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या थोडे कमकुवत आहेत. स्वतःला घटस्फोटित असल्याचे भासवून ती लग्नाचा प्रस्ताव मांडायची. शमशेर, मतलूब हसन, सलमान आणि साबिर या चार जणांसोबत तिने अशाच प्रकारे निकाह केला होता. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी कोणाशीही तिने कायदेशीर घटस्फोट घेतला नव्हता.
संपत्तीसाठी छळ आणि ब्लॅकमेलिंगचा फंडा
तपासात असे समोर आले आहे की, लग्नानंतर काही दिवस सर्वकाही व्यवस्थित चालायचे. मात्र, एकदा का हसीना घरात स्थिरावली की ती पतीवर घर किंवा इतर संपत्ती तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात करायची. जर पतीने विरोध केला, तर ती घरातील सदस्यांशी भांडण करायची आणि पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन घर सोडून निघून जायची.
पाचव्या पतीमुळे फुटलं भांडं!
हसीनाचा पाचवा पती तबरेज याने तिच्याविरोधात कायदेशीर लढा दिला. २७ मार्च २०२२ रोजी भोपाळमध्ये या दोघांचा निकाह झाला होता. लग्नानंतर हसीना आपल्या दोन मुलींसह तबरेजच्या घरी राहू लागली. काही दिवसातच तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. तिने तबरेजच्या मोठ्या भावाचा छळ सुरू केला आणि घर नावावर करण्यासाठी तगादा लावला. या रोजच्या कटकटीला आणि मानसिक छळाला कंटाळून तबरेजच्या भावाने अखेर टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेनंतर जेव्हा हसीनाच्या भूतकाळाचा शोध घेतला गेला, तेव्हा तिचे एकामागून एक पाच कारनामे उघड झाले.
न्यायालयाने झापलं, अन सुनावली शिक्षा
न्यायालयात हसीनाने स्वतःचा बचाव करताना काही पतींची नावे एकच आहेत' असा अजब दावा केला. मात्र, तिच्याकडे यासाठी कोणताही पुरावा नव्हता. सरकारी वकील नजर खान यांनी मांडलेले पुरावे आणि जबाब यांच्या आधारे न्यायालयाने हसीनाला बहुविवाह आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. समाजात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक संदेश जाणे गरजेचे असल्याचे नमूद करत न्यायालयाने तिला दोन वर्षांची जेल आणि २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Web Summary : Haseena, from Bhopal, married five men without divorcing, looting them. She forced property transfers, blackmailed husbands, leading to tragedy and exposure. Court sentenced her to two years in jail.
Web Summary : भोपाल की हसीना ने बिना तलाक दिए पांच पुरुषों से शादी की, उन्हें लूटा। उसने संपत्ति हस्तांतरण के लिए मजबूर किया, पतियों को ब्लैकमेल किया, जिससे त्रासदी और पर्दाफाश हुआ। अदालत ने उसे दो साल की जेल की सजा सुनाई।