मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात घरगुती हिंसाचाराचा बळी ठरलेला पती लोकेश माझीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये त्याची पत्नी त्याला बेदम मारहाण करताना आणि लाथा मारताना दिसत आहे. लोकेशने आपल्या पत्नीविरुद्ध सतना पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आता पत्नी हर्षिताने त्याची हात जोडून माफी मागायला सुरुवात केली आहे.
हर्षिताने दावा केला आहे की, तिने पहिल्यांदाच पतीवर हात उचलला होता आणि ती पुन्हा असं करणार नाही. तिला तिच्या पतीसोबत राहायचं आहे आणि ती त्याच्यावर खूप प्रेम करते. लोकेश लोकोपायलट आहे. सतना पोलिसांना दिलेल्या तक्रारीत लोकेशने सांगितलं की, त्यांचं लग्न जून २०२३ मध्ये हर्षिताशी झालं होतं. लग्नानंतर पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनी हुंड्याच्या नावाखाली लोकेशचा छळ करण्यास सुरुवात केली आणि खोटा खटला दाखल करण्याची धमकी दिली.
"पुन्हा असं कधीच करणार नाही"
पत्नीच्या छळाला कंटाळून लोकेशने घरात कॅमेरे बसवले होते. २० मार्च रोजी घडलेली ही घटना या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी हर्षिता, तिची आई आणि भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना नोटीस बजावली आहे. यानंतर हर्षिता मीडियासमोर आली आणि तिने पुन्हा असं कधीच करणार नाही असं म्हटलं आहे. कारण तिला आता तिचं घर वाचवायचं आहे.
"मला हात जोडून, पाय धरून माफी मागायची आहे"
"आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा लोकेश काहीतरी चुकीचं बोलला. त्यानंतर आम्ही घरी आल्यावर आमच्यात वाद झाला. माझं माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. वाद झाला तेव्हा आईही तिथे उपस्थित होती. तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण मला खूप राग येत होता. आता मी सर्वांची माफी मागायला आली आहे. पतीला घटस्फोट द्यायचा नाही. मला हात जोडून आणि पाय धरून त्याची माफी मागायची आहे. मी पुन्हा कधीही अशी चूक करणार नाही. जर मी असं काही केलं तर मला घराबाहेर हाकलून द्या" असं हर्षिताने म्हटलं आहे.