अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी एक मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार, घटनेच्या दोन तास आधीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं, परंतु घरात कोणीही एन्ट्री करताना दिसत नाही. हल्लेखोर आधीच इमारतीत आणि घरात घुसला असावा असा पोलिसांना संशय आहे. मात्र तरी देखील सीसीटीव्ही फुटेज अजूनही तपासलं जात आहे.
सुरुवातीच्या तपासात पोलिसांना सैफ अली खानच्या घरातील मोलकरणीवरही संशय आहे. पोलिसांना संशय आहे की, मोलकरणीने चोराला घरात एन्ट्री करण्यास मदत केली असावी. पोलिसांना असाही संशय आहे की, चोर आधीच सैफच्या घरात उपस्थित असावा. या सर्व बाबी लक्षात घेऊन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीस महत्त्वाच्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत. सैफच्या इमारतीतील इतर फ्लॅट्स आणि जवळच्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि सफाई कर्मचाऱ्यांची माहितीही गोळा केली जात आहे. पोलीस सैफ अली खानच्या घरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
करीना कपूर आणि मुलं सुरक्षित आहेत. मुंबई पोलिसांनी घटनेची पुष्टी केली त्यानंतर अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं. मुंबई जॉइंट सीपी लॉ अँड ऑर्डर यांनी घटनेची पुष्टी केली आहे आणि सांगितलं आहे की, घटनेनंतर सैफला उपचारासाठी लीलावती येथे नेण्यात आलं. तसेच आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला जात आहे. वांद्रे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
सैफ अली खानचा कसा वाचला जीव, देवदूतासारखं कोण आलं धावून, कोणी नेलं रुग्णालयात?
सैफ अली खानवर घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला आहे. यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेदरम्यान अभिनेता सैफ आणि चोर यांच्यातही झटापट झाल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर सैफचा सिक्योरिटी गार्ड आणि त्याचा ड्रायव्हर त्याच्या मदतीसाठी धावून आले, ते अभिनेत्याला रुग्णालयात घेऊन गेले.