मुंबई : लालबाग येथे वीणा जैन यांच्या हत्येनंतरही मुलगी रिम्पल जैन (२४) हिचे मित्रांशी चॅटिंग सुरू होते. त्यांचे या प्रकरणाची काही कनेक्शन आहे का, याबाबत काळाचौकी पोलिस अधिक तपास करत आहेत.
काळाचौकी पोलिसांकडून अमजद अली उर्फ बॉबीकडे चौकशी सुरू आहे. तो लालबागमध्ये सँडविच विकण्याचे काम करायचा. रिम्पल आणि तिची आई त्याच्याकडून नेहमी सँडविच घ्यायच्या. त्यावेळी तिची अमजदशी ओळख झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तो ७ जानेवारीला सँडविच स्टॉल बंद करून लखनौनजीकच्या आपल्या मूळ गावी गेला होता. तेव्हापासून तो रिम्पलच्या संपर्कात होता. त्यांचे चॅटिंग सुरू होते. तसेच, माटुंगा येथील एका चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्याही ती सतत संपर्कात होती. या तरुणाचीही पोलिस चौकशी करत आहेत.
रिम्पलने चाळीखाली असलेल्या मेडिकलमधून फिनाइल आणि काही वस्तू मागवल्या होत्या. त्यामुळे मेडिकलवाल्याचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याचप्रमाणे २७ डिसेंबरला आई पहिल्या मजल्यावरून पडली असे रिम्पलने पोलिसांना सांगितले. त्यावेळी चाळीखाली असलेल्या फ्लेव्हर्स ऑफ चायनीज या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हबीब आणि रोहित या दोन मुलांच्या मदतीने रिम्पलने आईला घरी आणले. त्याच दिवशी वीणा जैन यांचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा असून, त्यानंतरच वीणा यांची हत्या झाली की त्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडल्या, याची ठोस माहिती समोर येईल. दरम्यान, काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुन्हा चौकशी केली.