Surat Court: गुजरातमधील सुरत सत्र न्यायालयाने तीन वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणातून आरोपी तरुणाची निर्दोष मुक्तता करत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सत्र न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली. तीन वर्षे संमतीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लग्न करण्यास नकार देणे हा बलात्कार ठरत नाही, असं न्यायालयाने मान्य केलं. बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादावर न्यायालयाने आरोपी तरुणाला सोडण्यास सांगितले. त्यामुळे या निर्णयाची आता देशभरात चर्चा सुरु झालीय.
जुलै २०२२ मध्ये सुरतमधील दिंडोली येथील बीबीएचे शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने कटारगाम येथील एका तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. हा तरुण देखील एम.टेकचे शिक्षण घेत होता. तरुणाने तरुणीशी इंस्टाग्रामद्वारे मैत्री केली आणि तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर मुलीशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला, असं तक्रारीत म्हटले होते. तरुणीकडून तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आणि न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र सादर केले.
त्यानंतर तरुणाने सत्र न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला. यावेळी बचाव पक्षाचे तरुणाचे वकील अश्विन जे. जोगडिया यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने तक्रार दाखल करणाऱ्या मुलीशी जबरदस्तीने कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. प्रेमसंबंध तुटल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी वकील अश्विन जे. जोगडिया यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत म्हटलं की, जर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असेल तर तो बलात्कार नाही. सूरत सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला आणि तरुणाची निर्दोष मुक्तता केली.
तक्रारदार स्वतः सुशिक्षित आहे आणि तिला स्वतःचे चांगले-वाईट समजते. मुलगी आणि मुलगा वेगवेगळ्या जातीचे असल्याने, मुलगा आणि त्याच्या आईने लग्न करण्यास नकार दिला. मुलीने आरोपीसोबतचे तिचे संबंध सुरू ठेवले. मुलीने मुलासोबत जाताना कोणत्याही दबावाशिवाय हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये तिचे ओळखपत्र दिले होते. त्यामुळे तिच्यावर कोणताही जबरदस्ती नव्हता, असं न्यायालयाने म्हटले.
तरुणाशी असलेल्या संबंधांमुळे आपण गर्भवती राहिल्याचे तक्रारदार तरुणीने सांगितले. पण खटल्याच्या सुनावणीदरम्यान गर्भपाताचे पुरावे रेकॉर्डवर आले. यावेळी इतर वैद्यकीय पुराव्यांसह, डीएनए अहवाल देखील तरुण आणि तरुणाच्या नमुन्यांशी जुळत नसल्याचे वकील जोगडिया यांनी सांगितले. यासोबत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी साक्ष देताना सांगितले की, वैद्यकीय तपासणीदरम्यान तरुणीने ३० ते ३५ वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचे सांगितले होते. त्यामुळे तरुणाच्या वकिलांना संशय आला. बचाव पक्षाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, तरुणीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, पुरुषांपेक्षा महिलांना लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा जास्त असते. ही एक प्रकारची मानसिक स्थिती मानली जाते.