Sonam Raghuvanshi Case: इंदौरच्या राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे. हनिमूनच्या नावाखाली राजा रघुवंशी याला मेघालयला घेऊन गेलेल्या सोनमने पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणली. सोनम रघुवंशीनं तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या मदतीने पती राजा रघुवंशीची हत्या केली. दोघांच्या घरच्यांच्या संमतीने सोनम आणि राजाने लग्न केले होते. मात्र सोनमच्या मनात दुसरेच काही सुरु होते. प्रियकरासाठी तिने राजाला संपवण्याचा भयंकर कट रचला होता. आता राजा रघुवंशीच्या भावाने सोनमबाबत मोठा खुलासा केला आहे. सोनमने राजाला सोडून दुसऱ्याशी माझे लग्न लावले तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत असं तिच्या आईला सांगितले होते, असं मृत राजा रघुवंशी याचा भाऊ विपिनने म्हटलं.
इंदौरच्या राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याला अटक करण्यात आली. त्यानंतर आत विपिन रघुवंशीने सोनमबाबत खळबळजनक खुलासे केले आहेत. सोनमने लग्नापूर्वी तिच्या आईला इशारा दिला होता की जर हे लग्न झाले तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही, असं विपिनने सांगितले.
"सोनमच्या आईला तिच्या अफेअरची माहिती होती, पण तिने ते लपवून ठेवले. त्यामुळे सोनमच्या आईचीही चौकशी करायला हवी. जर सोनमच्या वडिलांना हे कळले असते तर त्यांनी राज कुशवाहाला नोकरीवरून काढून टाकले असते, म्हणूनच सोनमच्या आईने सगळं लपवून ठेवलं . सोनमने तिच्या आईला आधी सांगितले होते की जर तिचे लग्न राजसोबत झाले नाही तर त्याचे वाईट परिणाम होते. तिने कदाचित हे तिच्या वडिलांना किंवा भावाला सांगितले नसेल. सोनम आणि राजला मंगल दोष होता. म्हणून, तिने कदाचित असे ठरवले असेल की एकदा ती विधवा झाली की ती नंतर कोणाशीही लग्न करू शकते," असं विपिन रघुवंशी याने सांगितले.
दरम्यान, राजा रघुवंशीच्या हत्येतील प्रमुख संशयित आरोपी असलेली सोनम रघुवंशी बेपत्ता झाल्यापासून १७ दिवसांनी गाझीपूर येथे एका ढाब्यावर सापडली होती. सोनमने तिच्या भावाला फोन करुन तिच्या ठिकाणाची माहिती दिली. त्यानंतर पोलीस सोनमपर्यंत पोहोचले. दुसरीकडे मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशीच्या हत्येमागे सोनमच असल्याचा आरोप केला आहे.