प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: येथील पूर्वेकडील कोळशेवाडी परिसरातील फ्लिपकार्ट हबवर डल्ला मारून विविध कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप असा लाखोंचा माल चोरी करणा-या चौकडीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे अटक आरोपी त्या हबमध्ये काम करायचे. यातील काहींनी नोकरी सोडली होती. चौघांनी मौजमजा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून संगनमताने ही चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
प्रणव पांचाळ (वय २५), प्रशांत शेलार ( वय २५), अमित राणे ( वय ३० ), अजित राणे (वय २८ ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमित आणि अजित हे दोघे सख्खे बंधू आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेले विविध कंपनीचे २३ मोबाईल, २ लॅपटॉप, १ कॅनान कंपनीचा इलेक्ट्रीक कॅमेरा, इलेक्ट्रीक फॅन तसेच विविध कंपनीचे एअर बडस व अन्य वस्तू अशा एकुण सहा लाख ३३ हजार ६७९ रूपयांच्या ५० वस्तू जप्त केल्या आहेत. आरोपींना पुढील तपासकामी कोळशेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अजित शिंदे यांनी दिली. तीन महिन्यापूर्वी आरोपींनी कोळशेवाडी चक्की नाका परिसरातील अमेय हॉस्पिटल समोरील फ्लिप कार्डच्या हबमधून चोरी केली होती.
...अन पोलिसांनी खंबाळपाडा रोडवर लावला सापळा
काहीजण डोंबिवली पुर्वेकडील खंबाळपाडा रोड येथे चोरीचे मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच इतर वस्तू विक्री करणेकरीता येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरिक्षक शिंदे यांच्यासह सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरिक्षक विनोद पाटील, पोलिस कर्मचारी विलास कडु, दिपक महाजन, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, सतिश सोनवणे आदिंनी सापळा लावून चौकडीला अटक केली.