रात्रीचा अंधार होता, नदीचं पाणी खळखळ वाहत होते. त्याचवेळी बांदाच्या चिल्लाघाट पुलावर एक बाइक थांबली. त्या बाइकवर निळ्या रंगाची सुटकेस होती. त्या दोघांनी सुटकेस खेचत खेचत पुलाच्या रेलिंगवर आणली आणि एकमेकांकडे पाहत ती सुटकेस नदीत फेकून दिली. पाण्याच्या प्रवाहात सुटकेस जोरदार आदळल्याचा आवाज आला. त्यानंतर ते दोघे तिथून निघून गेले. पाण्याच्या प्रवाहासोबत सुटकेसमधील रहस्यही वाहून जाईल. ते कुणालाही कळणार नाही असेच त्या दोघांना वाटत होते. परंतु सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी ते बाहेर येतेच.
ही कहाणी सुरू होते कानपूरच्या एका परिसरातून..विजयश्रीच्या ४ मुलांपैकी एक २४ वर्षीय आकांक्षा कानपूर येथे राहून एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. स्वावलंबी बनण्याचं तिचे स्वप्न होते. त्याचवेळी तिची ओळख फतेहपूर येथे राहणाऱ्या सूरजसोबत झाली. आधी मैत्री, मग प्रेम आणि त्यानंतर काही महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. या दोघांनी भाड्याने खोली घेतली आणि तिथे एकत्रित राहू लागले. परंतु प्रेमाच्या घरात संशयाचे भूत शिरले. सूरज दुसऱ्या मुलींसोबत बोलायचा. आकांक्षा त्याला विरोध करायची. त्यातूनच दोघांच्या नात्यात खटके उडू लागले.
२१ जुलैचा तो अखेरचा दिवस
आकांक्षाने स्पष्ट शब्दात सूरजला सांगितले, मला वेगळे व्हायचंय...पण सूरज ते ऐकायला तयार नव्हता. २१ जुलैच्या रात्री तो जबरदस्तीने आकांक्षाच्या घरात शिरला. या दोघांमध्ये जोरदार वाद झाले. त्या रागाच्या भरात आकांक्षाचे डोके सूरजने भिंतीवर आपटले. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सूरजकडे २ पर्याय होते. एकतर तिला वाचवणे नाहीतर कायमचे संपवणे...त्यातील दुसरा मार्ग त्याने निवडला. बेशुद्ध अवस्थेत त्याने तिचा गळा दाबला त्यात तडफडत तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर सूरजने घाबरून मित्राला फोन केला. आशिष घटनास्थळी पोहचला. मग या दोघांनी मिळून आकांक्षाचा मृतदेह मोठ्या सुटकेसमध्ये टाकून रात्रीच्या अंधारात १०० किमी दूर अंतरावर यमुना नदीत फेकून दिला.
गुन्हेगाराचा गूढ खेळ
आकांक्षाच्या हत्येनंतर सूरजने गूढ खेळ खेळला, त्यामुळे ही कहाणी आणखी रहस्यमय झाली. आकांक्षाचा मोबाईल सूरजने त्याच्या जवळ ठेवला होता. त्यावरून त्याने तिच्या आईला मेसेज पाठवला. मी लखनौला आहे, येथे नोकरी मिळाली आहे. सूरजसोबत ब्रेकअप केले आहे. तू चिंता करू नकोस, त्यानंतर रेस्टॉरंट मालकालाही मी लखनौला शिफ्ट होतेय असा मेसेज आकांक्षाच्या मोबाईलवरून सूरजने पाठवला. बरेच दिवस सूरज हा खेळ खेळत राहिला. मेसेज पाठवून आकांक्षा जिवंत असल्याचा बनाव त्याने रचला. मात्र आकांक्षा ना फोन करत होती, ना कॉल केला तरी उचलत होती त्यानंतर आईला संशय आला. आईने पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली.
...अन् सत्य समोर आले
या प्रकरणाचा तपास सुरू झाला. पोलिसांनी सूरजच्या मोबाईल सीडीआर आणि लोकेशन तपासले. तिथूनच सुगावा हाती लागला. लोकेशननुसार २१ जुलैच्या रात्री सूरज कानपूर ते बांदा गेला होता. सूरज आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. खाकीचा धाक दाखवत चौकशी सुरू केली. त्यानंतर दोघांचा संयम तुटला आणि सत्य पोलिसांसमोर आले. पोलिसांनी या दोघांना अटक करून आकांक्षाचा मृतदेह शोधण्यासाठी टीम पाचारण केली. अद्याप तिचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे.