पिंपरी :पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून दापोडीत एकाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. सुनील विठ्ठल आरडे (वय २६,रा.बोपोडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पूर्ववैमनस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खून केला. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोडी येथे सुनील आरडे त्याचा मित्र अनिकेत चांदणे याच्याबरोबर थांबला असताना, तेथे तीन ते चार जणांचे टोळके आले. त्यांनी सुनीलसह अनिकेतवर हल्ला चढविला. बाजुला पडलेले सिमेंटचे गट्टू सुनीलच्या डोक्यात मारले. या हल्लयात सुनील गंभीर जखमी झाला. त्याचा मित्र अनिकेतलाही या टोळक्याने लाथा बुक्यांनी तसेच दगडाने मारहाण केली. जखमी झालेल्या दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापुर्वीच आरडे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अनिकेतवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. भोसरी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
दापोडीत पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून एकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 15:46 IST