नंदुरबार : शहादा तालुक्यातील डोंगरगाव नजीक स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने एकाकडून १ लाख १३ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. वडगाव, येथील एकाविरुद्ध ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, शहादा-वडगाव रस्त्यावर एकजण ओला गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाला मिळाली होती. पथकाने या रस्त्यावर पाळत ठेवली असता डोंगरगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर रामदास टांग्या पावरा (४८) हा दुचाकीवरून (क्रमांक एमपी ३९ पी ८४३०) जाताना दिसला. त्याची संशयास्पद हालचाल लक्षात घेता त्याला पथकाने थांबविले. त्याची व दुचाकीची झडती घेतली असता त्याच्याकडील एका पिशवीत नऊ किलो ४३६ ग्रॅम ओला गांजा मिळून आला. त्याची बाजारभाव प्रमाणे किंमत १ लाख १३ हजार ३२३ रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजासह ७० हजार रुपयांची दुचाकी जप्त केली. याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे हवालदार विकास कापुरे यांनी फिर्याद दिल्याने रामदास टांग्या पावरा याच्याविरुद्ध शहादा पोलिसात गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे करीत आहे.
नंदुरबार एलसीबीने पकडला एक लाखाचा गांजा
By मनोज शेलार | Updated: March 8, 2023 18:16 IST