नोएडा - गुड वाइब्स ओन्ली, ड्रीम स्टे हंबलसारखे सकारात्मक सुविचार ज्या खोलीतील भिंतीवर लिहिले होते जिथं आसमाची हत्या झाली. नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र देणाऱ्या खोलीतील भिंतीवर रक्ताचे डाग पडले. या घटनेनंतर कुटुंब उद्ध्वस्त झालं. पप्पा, आईवर संशय घेत होते असं आसमाच्या मुलाने सांगितले. तिचा मोबाईल हिसकावून घेतला, तिला त्रास दिला जात होता असं समोर आले आहे. या हत्याकांडानंतर दोन्ही मुलांना आसमाची बहीण तिच्यासोबत घेऊन गेली आहे.
आई वडिलांमध्ये २-३ दिवसांपासून वाद वाढला होता असं आसमाचा मुलगा समद म्हणाला तर जेव्हा सकाळी ५ वाजता कॉल आला तेव्हा कुटुंबासह आसमाचे दाजी घरी पोहचले, तिथे समदनं आईला घेऊन जा असं म्हटलं. त्यानंतर १ वाजता या हत्येबद्दल माहिती मिळाली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. जर आम्ही समदचं ऐकून आसमाला घेऊन गेलो असतो तर कदाचित ती आज वाचली असती अशी खंत आसमाच्या कुटुंबाला वाटत आहे.
कुटुंबाच्या माहितीनुसार, नूरूल्ला इंजिनिअर होता परंतु दीर्घ काळापासून तो ऑफिसला जात नव्हता. घरातून काही काम करायचा पण काय करत होता याची माहिती नाही. कुटुंबाला सांभाळण्यासाठी आसमानेही जॉब सुरू केला. तिला तिच्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे होते. आसमाही इंजिनिअर होती. तिने जामिया इस्लामियातून इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केले होते. ती खासगी कंपनीत काम करत होती. बिहारच्या नूरूल्लासोबत तिचं २००५ साली लग्न झालं होते. तोदेखील इंजिनिअर होता. दोघांच्या लग्नाला २० वर्ष पूर्ण झाली होती. मात्र पती नूरुल्लाच्या डोक्यात संशयाचं भूत चढलं होते. त्यातून ही क्रूर घटना घडली. पतीने हातोड्याने वार करत आसमाचा खून केला.
दरम्यान, या घटनेनंतर मुलाने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला त्याशिवाय आरोपीला ताब्यात घेतले.