गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान त्यांना कोणत्याही हिंसक कारवाया करण्यात यश आले नसले तरी त्यासाठी त्यांनी केलेली तयारी उघडकीस आली. जंगलात जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य वेळीच पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे घातपात घडवून आणण्याचा नक्षलींचा डाव उधळला गेला.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. त्यामुळे नक्षलविरोधी अभियान राबविणारी सर्व पोलीस यंत्रणा सतर्क होती. यादरम्यान ४ ऑगस्ट रोजी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या कोटगुल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत हेटळकसा जंगल परिसरात कोरची, टिपागड एलओएस आणि कंपनी क्रमांक ४ च्या नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य एका ड्रममध्ये भरून जमिनीत पुरून ठेवले होते.
अन् शिताफीने शोधून काढली स्फोटके
- गुप्त माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात विशेष अभियान पथक गडचिरोली, सीआरपीएफ १९२ बटालियनच्या यंग प्लाटूनचे जवान आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी मौजा हेटळकसा जंगल परिसरात एका ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्य शोधून काढण्यात यश मिळविले.
- हे साहित्य पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या मोठ्या टाकीमध्ये ठेवून ती टाकी जमिनीत गाडलेली होती. यामध्ये २ कुकर, त्यापैकी एक स्फोटकांनी भरलेला, ४ कार रिमोट, ३ वायर बंडल, ८ पॉकेट डिस्टेंबर कलर, पिवळ्या रंगाची पावडर (अंदाजे १ किलो), राखाडी पावडर (अंदाजे २ किलो), पांढरी पावडर (१ पाव), पांढरा दाणेदार पदार्थ (५० ग्रॅम) आणि २ नक्षल पुस्तकेही होती.