१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्ली रस्त्यावर चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला. आता निर्भयाच्या आईने व्यथा मांडली असून १२ वर्षे उलटून गेली आहेत, मात्र आजही परिस्थिती तशीच आहे असं म्हटलं. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर १७ दिवसांनी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. निर्भयाच्या दोषींना शिक्षा होण्यासाठी ८ वर्षांचा कालावधी लागला आणि २०२० मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.
दिल्लीतील २०१२ मधील सामूहिक बलात्कार पीडित 'निर्भया' ची आई आशा देवी यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला असून आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी संघर्ष अजूनही सुरू आहे, पण परिस्थिती बदललेली नाही, असं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, आता १२ वर्षे झाली... तेव्हा जशी परिस्थिती होती तशीच आता आहे. मला हे सांगताना अत्यंत दुःख होतं की, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी संघर्ष अजूनही सुरू आहे, तरीही परिस्थिती बदललेली नाही. परिस्थिती आता आणखी बिकट झाली आहे.
निर्भयाची आई म्हणाली, 'न्याय मिळण्याची कोणतीही आशा नाही. समाज कुठे चालला आहे, आपण कोणत्या समाजात राहत आहोत. 'निर्भया'ला १२ वर्षे झाली आहेत. तिला न्याय मिळाला, गुन्हेगारांना शिक्षा झाली, पण इतक्या घटना घडल्या आणि इतर मुलींना न्याय मिळाला असं वाटत नाही. आपल्या समाजात आणि व्यवस्थेत सुधारणा होण्याची गरज आहे.
निर्भया प्रकरणात मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह यांच्यासह सहा जणांना आरोपी करण्यात आली. त्यापैकी एक अल्पवयीन होता. या खटल्यातील आरोपी राम सिंह याने खटला सुरू झाल्यानंतर तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. चाचणीनंतर अल्पवयीन मुलाला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला सुधारगृहात पाठवण्यात आलं. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर अखेर २० मार्च २०२० रोजी या प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली.