ग्रेटर नोएडामधील कासना पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या निक्की हत्या प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. मृत महिलेच्या मुलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांच्या क्रूर कृत्याचा खुलासा केला आहे. "बाबांनी आधी आईवर काहीतरी टाकलं, मग तिला कानाखाली मारली आणि लायटरने पेटवून दिलं," असे त्या मुलाने सांगितले. याशिवाय, निक्कीच्या आईने जावई विपिनबद्दल सांगितलेल्या गोष्टी ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील.
हुंड्यासाठी छळ; निक्कीच्या आईचा आरोप
निक्कीच्या आईने सांगितले की, त्यांनी लग्नात जावयाला हुंड्यात स्कार्पिओ गाडी दिली होती. तरीही तो रोज नवनवीन मागण्या करत होता. "आम्ही आधी त्याची स्विफ्ट डिझायरची मागणी पूर्ण केली, त्यानंतर स्कार्पिओ दिली. तरीही तो कधी एक लाख तर कधी दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणायचा. त्याचे एकच काम होते- फिरणे आणि मुलींना फिरवणे. आमच्या मुलीच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत," असे निक्कीच्या आईने सांगितले. "आम्हाला आता रक्ताच्या बदल्यात रक्त पाहिजे," अशी मागणीही त्यांनी केली.
मरण्याआधी निक्की म्हणाली होती 'हा मला मारून टाकेल'
निक्कीच्या आईने सांगितले की, त्यांनी जावई विपिन भाटीच्या प्रत्येक मागणीची पूर्तता केली. "आमची मुलगी आनंदी राहावी म्हणून आम्ही त्याला बुलेट बाईकही दिली. पण तरीही त्याने आमच्या मुलीला त्रास देणे सोडले नाही. तिला जिवंत जाळून मारण्याआधी फक्त पाच मिनिटे आधी माझे तिच्याशी बोलणे झाले होते. 'आई, मी आजच घरी येऊ का? नाहीतर हा मला मारून टाकेल,' असे ती म्हणाली होती. त्यानंतर त्या लोकांनी तिला मारहाण केली. ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर केमिकल टाकून तिला पेटवून दिले आणि माझ्या मुलीला संपवून टाकले," असे म्हणताना निक्कीच्या आईचा कंठ दाटून आला.
सासूचेही क्रूर कृत्य
निक्कीची आई पुढे म्हणाली, "आमच्या दुसऱ्या मुलीचे लग्नही त्याच घरात झाले आहे. जावई निक्कीला आणि आम्हालाही शिवीगाळ करत होता. सासूही निक्कीचे केस ओढून आणि चप्पल-काठीने मारहाण करत असे. आमच्याकडे तिच्या मारहाणीचा व्हिडीओही आहे. माझ्या दुसऱ्या मुलीनेच हा व्हिडीओ पुरावा म्हणून बनवला होता. पण त्या नराधमांनी तिला खरंच मारून टाकले. आम्हाला फक्त एवढेच पाहिजे की, जावई, सासू आणि सासऱ्याला फाशी व्हावी. रक्ताच्या बदल्यात आम्हाला फक्त रक्तच पाहिजे."
आरोपीला अटक, इतरांचीही शोध सुरू
ग्रेटर नोएडाचे एडीसीपी सुधीर कुमार यांनी सांगितले की, आरोपी पती विपिनला ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींनाही पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. "२१ ऑगस्ट रोजी आम्हाला फोर्टिस रुग्णालयातून माहिती मिळाली की, एक महिला गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत दाखल आहे. तिला सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले, परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. मृत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पतीला अटक झाली असून, इतरांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल," असे त्यांनी सांगितले.
आरोपीला कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही
दरम्यान, विपिनला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. अटकेच्या वेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कासनाचे एसएचओ यांनी त्याच्या पायावर गोळी मारली, ज्यामुळे तो जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्याला विचारले की पत्नीला मारल्याचा पश्चात्ताप आहे का, तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. "मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी तिला मारले नाही. ती स्वतःच मेली. पती-पत्नीमध्ये भांडणे होतच असतात, ही खूप सामान्य गोष्ट आहे," असे त्याने म्हटले.