नारायण बडगुजर
पिंपरी : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या बेपत्ता झालेल्या नातेवाईक तरुणाचा शोध लागला आहे. त्याने स्वत: रविवारी (दि. ५) सकाळी साडेनऊच्या सुमारास मनमाड पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
सुमित भागवत गुट्टे (२४, रा. दैठाणा घाट, ता. परळी, जि. बीड) हे २ जानेवारी रोजी बेपत्ता झाले होते. या प्रकरणी सुमित यांच्या आईने शुक्रवारी (दि. ३) सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भाचीला गुट्टे यांच्या गावातच दिले आहे. सुमित हा आमदार गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा आहे. सुमित हे नोकरीसाठी गावावरून पिंपरी-चिंचवड येथे आले. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरीसाठी मुलाखत द्यायला चाललो आहे, असे सांगून ते गावावरून शहरात आले. दोन दिवस ते आळंदी येथे राहिले. त्यांनतर गुरुवारी सकाळी ते सांगवी येथील रक्षक चौक येथे आले. मात्र, तेथून ते बेपत्ता झाले.
दरम्यान, सुमित हे रविवारी (दि. ५) सकाळी साडेनऊच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील मनमाड पोलिस ठाण्यात गेले. मी पुणे येथून आलो आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर मनमाडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सांगवीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांना तसेच सुमित यांच्या नातेवाईकांना माहिती दिली.
रिक्षा करून गाठले पोलिस ठाणे
सुमित गुट्टे हे रविवारी सकाळी मनमाड बसस्थानकावर उतरले. मला पुण्याला जायचे आहे, असे सांगून ते बसस्थानकावर चौकशी करत होते. तुम्ही पुण्यातून आला आणि पुन्हा पुण्यालाच कशासाठी जायचे आहे, असे त्यांना काही जणांनी विचारले. सुमित यांच्याकडे १२० रुपये होते. त्यातील २० रुपये रिक्षावाल्याला देऊन त्यांनी रिक्षाने मनमाड पोलिस ठाणे गाठले.
इंजेक्शन टोचल्यासारखे वाटले अन्...
सुमित हे मुलाखतीसाठी रुग्णालयात जाण्यास पुण्यातील भारती विद्यापीठापासून एका रिक्षातून निघाले. त्यावेळी त्यांना इंजेक्शन टोचल्यासारखे वाटले. त्यानंतर मी मनमाड येथे कसा आलो, नेमके काय झाले हे आठवत नसल्याचे सुमित यांनी सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.