नागपुरात  भिसी-लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 09:16 PM2020-03-11T21:16:26+5:302020-03-11T21:17:55+5:30

भिसी आणि लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेने दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. तपासात १५ जणांना जवळपास २ कोटी रुपयांनी फसविल्याची माहिती आहे.

Millions cheat in the name of BC-Lucky Draw in Nagpur | नागपुरात  भिसी-लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधींनी फसवणूक

नागपुरात  भिसी-लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधींनी फसवणूक

Next
ठळक मुद्देव्यापारी बंधूंना अटक : अनेक नागरिक झालेत शिकार, सदर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भिसी आणि लकी ड्रॉच्या नावावर कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. गुन्हे शाखेने दोन व्यापारी बंधूंना अटक केली आहे. तपासात १५ जणांना जवळपास २ कोटी रुपयांनी फसविल्याची माहिती आहे.
नागपुरात सुरू असलेल्या भिसीच्या रॅकेटची माहिती या घटनेमुळे उजेडात आली आहे. आरोपी कश्मिरी गल्ली, पाचपावली येथील रहिवासी हरप्रीतसिंह ऊर्फ चिंटू गुरुमितसिंह अलघ आणि त्याचा भाऊ गमनप्रीतसिंह उर्फ बिन्नी इकबालसिंह अलघ हे आहेत. अलघ बंधू अनेक दिवसांपासून भिसीच्या व्यवसायात आहेत. ते व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्युशन स्कीम आणि मासिक लकी ड्रॉच्या माध्यमातून नागरिकांना आकर्षित करीत होते. या स्कीमच्या माध्यमातून नागरिक त्यांच्याशी जुळले होते. कडबी चौक येथील रहिवासी हरविंदरसिंह नरुलांसह अनेक नागरिकांनी अलघ बांधवांकडे गुंतवणूक केली होती. नरुला यांनी एप्रिल २०१६ पासून अलघ बंधूंकडे व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्यूशन स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरू केले होते. या स्कीममध्ये भिसीच्या धर्तीवर नागरिकांना वेगवेगळ्या वेळी रक्कम मिळणार होती. नरुला यांनी एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान गुंतवणूक केली. त्यांना ८ लाख २० हजार रुपये मिळणार होते. नरुलांनी २०१८ मध्ये पैसे परत मागितल्यानंतर अलघ बंधंूनी ही रक्कम मंथली लकी ड्रॉ स्कीमध्ये ट्रान्सफर केल्याची बतावणी केली. त्यांनी नरुलांना मंथली लकी ड्रॉ स्कीममध्ये मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. मंथली लकी ड्रॉ स्कीमचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नरुला यांनी पैसे मागणे सुरू केले. परंतु त्यानंतरही अलघ बंधू टाळाटाळ करू लागले. नरुलांसह अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींकडे व्हर्च्युअल कॉन्ट्रिब्यूशन स्कीम आणि मंथली लकी ड्रॉ स्कीम अंतर्गत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. नरुलांसारखेच आरोपी सर्वांनाच टाळाटाळ करीत होते. खूप दिवसांपासून त्रस्त झाल्यामुळे नागरिकांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांना तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या हप्ता वसुली प्रतिबंधक पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात १५ नागरिकांची दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे पोलिसांनी नरुलांच्या तक्रारीवरून आरोपी अलघ बंधूंना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करून १६ मार्चपर्यंत ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू आहे. पीडितांनी पाचपावली ठाण्यातही तक्रार केली होती.
पोलिसांनी काहीच कारवाई न केल्यामुळे गुंतवणूकदार शांत झाले होते. आरोपी आपली मोठी रक्कम नागरिकांकडे बाकी असल्याचे सांगत आहेत. ही रक्कम मिळताच पैसे परत करण्याचे आश्वासन देत आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी अलघ बंधूंचा पीडितांशी निगडित एका युवकाशी वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण चिघळले.

अनेक नागरिकांनी उचलला फायदा
आरोपी अलघ बंधूंकडून अनेक नागरिकांनी फायदा घेतला आहे. त्यांचे पोलीस आणि गुंडांशी संबंध आहेत. त्यांची सरबराई करताना आरोपींचे खिसे रिकामे झाले. त्यांनाही बाजारातून मोठी रक्कम घ्यावयाची आहे. अलघ बंधू हॉटेल आणि फायनान्सच्या व्यवसायाशी निगडित आहेत. पोलीस त्यांची माहिती काढत आहेत.

Web Title: Millions cheat in the name of BC-Lucky Draw in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.