प्रेमविवाह करून सुखाचा संसार थाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण नर्सचा तिच्याच पतीने क्रूरपणे बळी घेतल्याची खळबळजनक घटना हरियाणातील गुरुग्राममध्ये घडली आहे. अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या पतीने पत्नीला गुंगीचे विषारी इंजेक्शन टोचून तिची हत्या केली. काजल असे या दुर्दैवी नर्सचे नाव असून, अवघ्या ४ महिन्यांपूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला होता.
नेमकं प्रकरण काय?
मूळची कानपूरची असलेली काजल आणि गाझियाबादचा अरुण शर्मा यांची ओळख गुरुग्राममधील एका रुग्णालयात झाली होती. काजल तिथे नर्स होती, तर अरुण एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होता. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीने मोठ्या थाटात लग्न केले. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच अरुणचे काळे कारनामे समोर येऊ लागले.
नशेसाठी पैशांची मागणी आणि छळ
अरुणला अमली पदार्थांचे व्यसन होते, ही बाब त्याने लग्नापूर्वी लपवून ठेवली होती. व्यसनामुळे त्याची नोकरीही गेली होती. नशेसाठी तो सतत काजलकडे पैशांची मागणी करायचा आणि पैसे न दिल्यास तिला बेदम मारहाण करायचा. या त्रासाला कंटाळून काजल होळीच्या सुमारास आपल्या माहेरी गढ़ी हरसरू भागात राहायला गेली होती. काही दिवसांनी अरुणही तिथेच मनधरणी करून राहायला आला.
१० मिनिटांत खेळ संपवला!
१८ मार्चच्या सकाळी अरुणने काजलला काहीतरी बहाणा करून घराच्या खालच्या मजल्यावर बोलावले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काजल खाली गेल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत तिची प्रकृती खालावली आणि तिच्या नाकातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. नातेवाईकांचा असा आरोप आहे की, अरुणने तिला तिथेच कोणतेतरी घातक इंजेक्शन टोचले. घराच्या बाथरूममध्ये पोलिसांना एक वापरलेली सिरिंज सापडली आहे, ज्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे.
रुग्णालयातून आरोपी पती फरार
काजलची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत अरुण सोबतच होता, मात्र डॉक्टरांनी काजलला मृत घोषित करताच त्याने तिथून पळ काढला. सध्या पोलीस आरोपी अरुणचा शोध घेत असून काजलचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. विसेरा अहवाल आल्यानंतर तिला नेमके कोणते इंजेक्शन देण्यात आले होते, हे स्पष्ट होईल.