लोकमत न्यूज नेटवर्क, वडवणी: येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात बुधवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास सरकरी वकील व्ही.एल.चंदेल (रा.इंदेवाडी जि.परभणी) यांनी आपल्याच कक्षातील खिडकीच्या गजाला सत्कार करण्याच्या शालने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात काय आहे, याची माहिती पोलिसांनी दिली नाही.
चंदेल हे जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून वडवणी येथील न्यायालयात रुजू झाले होते. ते सकाळी १० वाजता न्यायालयात आले होते. आल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. कर्मचारी हे जेवणाचा डब्बा ठेवण्यासाठी गेले असता, हा प्रकार समोर आला. यानंतर, वडवणी पोलिसांसह अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला होता.
खिशातील चिठ्ठीत आत्महत्येचे कारण?
चंदेल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिलेली होती. ती चिठ्ठी त्यांच्या खिशामध्ये पोलिसांना मिळाली. याच चिठ्ठीत आत्महत्याचे कारण असल्याची सांगण्यात येत आहे, परंतु वडवणी पोलिसांनी याची माहिती देण्यास टाळाटाळ केली.
काय म्हणाले पोलिस?
चिठ्ठीसंदर्भात वडवणी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांना विचारणा केली. त्यांनी सरकारी वकील चंदेल यांच्या खिशात चिठ्ठी मिळाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला, परंतु त्या संदर्भात आत्ताच माहिती देता येणार नाही, असे म्हणत पुढील माहितीबाबत मौन बाळगले.