कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेवर दोनदा गोळीबार करण्यात आला आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. कॅप्स कॅफेमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने गोळीबार केला आहे. सलमान खानशी जवळीक असणं कपिल शर्माला महागात पडलं आहे.
लॉरेन्स ग्रुपचा गँगस्टर हॅरी बॉक्सरचा ऑडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेटफ्लिक्स शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सीझन २ च्या पहिल्या भागात कॉमेडियनने सलमानला आमंत्रित केलं होतं. कपिलने सलमान खानला त्याच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित करणं बिश्नोई गँगला आवडलेलं नाही. याचा बदला घेण्यासाठी कपिलच्या कॅफेवर गोळीबार करण्यात आला. "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल" अशी धमकी देण्यात आली आहे.
कपिल आणि बॉलिवूडला धमकी
ऑडिओमध्ये हॅरी बॉक्सर संपूर्ण इंडस्ट्रीला धमकी देतो आणि म्हणतो- "कपिल शर्माच्या रेस्टॉरंटमध्ये आधी आणि आता गोळीबार झाला कारण त्याने सलमान खानला त्याच्या शोच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केलं होतं. पुढच्या वेळी, जो कोणी दिग्दर्शक, निर्माता, कलाकार असेल, आम्ही त्यांना इशारा देणार नाही. थेट छातीवर गोळी झाडली जाईल. मुंबईतील सर्व कलाकार आणि निर्मात्यांना इशारा आहे. आम्ही मुंबईचे वातावरण इतके बिघडवू की तुम्ही कल्पनाही केली नसेल."
"जर कोणी सलमानसोबत काम केलं असेल... तो छोटा कलाकार असो, छोटा दिग्दर्शक असो, आम्ही कोणालाही सोडणार नाही, आम्ही त्याला मारू. त्याला मारण्यासाठी आम्हाला कोणत्याही थराला जावं लागेल, आम्ही त्याला मारू. जर कोणी सलमान खानसोबत काम केलं असेल तर तो स्वतःच्या मृत्यूसाठी जबाबदार असेल."
सलमान-लॉरेन्सचे वैर
कपिलला दिलेल्या या धमकीनंतर इंडस्ट्रीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि सलमानचं वैर वर्षानुवर्षे जुनं आहे. काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स सलमान खानच्या मागे लागला आहे. त्याने अनेक वेळा अभिनेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या घरावर गोळीबारही केला. इतक्या हल्ल्यांच्या प्रयत्नांनंतर सलमानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणाबद्दल सलमानने त्याच्या समाजाची माफी मागावी अशी लॉरेन्सची मागणी आहे.