गाझियाबाद: कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलं आहे. प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांनी हा खून केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यापासून ते फरार होते. या तिघांनी खुनाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या पंकजचा मृतदेह एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या खड्ड्यात आढळून आला. त्यानंतर परिसरात खळबळ माजली. मृतदेह सापडल्यानंतर पंकजची प्रेयसी अंकिता, तिचे वडील हरिओम आणि आई सुलेखा फरार होते. त्यांना काल सकाळी साहिदाबाद रेल्वे स्थानक पोलिसांनी अटक केली. आपणच पंकजचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. पंकज 9 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. गाझियाबादचे (शहर) पोलीस अधीक्षक मनीष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज चौथ्या वर्षात शिकत होता. अंकिता त्याच्याकडून ट्युशन घ्यायची. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. पंकजनं शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. याला अंकितानं होकार दिला. अंकिताच्या आई, वडिलांना या सर्व गोष्टींची कल्पना येताच त्यांनी पंकजला मारण्याची योजना आखली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी यामध्ये अंकितालादेखील सामील करून घेतलं.9 ऑक्टोबरला अंकितानं पंकजला घरी बोलावलं. घरी मी एकटीच आहे. तू मला भेटायला ये, असं अंकितानं पंकजला सांगितलं. यानंतर पंकज गिरीधर एन्क्लेव्ह कॉलनीत असलेल्या अंकिताच्या घरी पोहोचला. अंकिता पंकजला बेसमेंटला घेऊन गेली. तिथे आधीच खड्डा खणून ठेवण्यात आला होता. पंकज अंकितासोबत बेसमेंटमध्ये येताच लपून बसलेले अंकिताचे आई, वडील समोर आले. त्यांनी पंकजचे हात, पाय बांधले आणि गळा दाबून त्याला संपवलं. यानंतर तिघांनी पंकजचा मृतदेह खड्ड्यात ढकलला आणि तो खड्डा बुजवला.
घरी कोणीच नाही, तू भेटायला ये; गर्लफ्रेंडच्या 'त्या' मेसेजनं घात केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 09:06 IST